चौकशी पथकाकडून शौचालय बांधकामाबाबत झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:53 PM2017-08-03T23:53:05+5:302017-08-03T23:53:05+5:30
सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने गुरुवारी स्वच्छ भारत मिशन कक्षाची झाडाझडती घेतली. यावेळी या पथकाला महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधी वितरित करीत असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे जिल्हा परिषदेकडून पालन झाले की नाही, या संदर्भात चौकशी करण्यासाठी आलेल्या सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने गुरुवारी स्वच्छ भारत मिशन कक्षाची झाडाझडती घेतली. यावेळी या पथकाला महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट निधी वितरित करण्याऐवजी खाजगी दुकानदारांना हा निधी देऊन त्यांच्याकडील साहित्य लाभार्थ्यांना दिल्याचे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या संदर्भात विधानपरिषदेत आ.बाबाजानी दुर्राणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मनोज चौधर यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांचे पथक गुरुवारी चौकशीसाठी परभणीत दाखल झाले. या पथकाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत निधी वितरित करीत असताना मार्गदर्शक तत्वे पाळण्यात आली की नाही, जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर वितरित करण्यात आलेल्या निधीच्या जमाखर्चाचा ताळमेळ, मंजुरी आदेश, खर्च प्रमाणके, निविदा करारनामे, कार्यारंभ आदेश व प्रदान करण्यात आलेल्या देयकांचा बँक खात्याचा तपशील याबाबतची चौकशी केली. याशिवाय निधी वितरित करण्यात आलेल्या गावांमधील ग्रामपंचायतींनी तशी मागणी जि.प.कडे नोंदविली होती का? ज्या लाभार्थ्यांना साहित्य वितरित करण्यात आले, त्यांची पोहोच घेतली का? साहित्य खरेदी करण्यात आलेल्या विशिष्ट दुकानांची निवड कशाच्या आधारे करण्यात आली? आदी बाबतची माहिती या पथकाने नोंदविली.
अनेक फाईलींची तपासणी केल्यानंतर पथकाच्या हाताला महत्त्वपूर्ण माहिती लागली असल्याचे समजते.