पूर्णा नदीच्या पुरामुळे जुन्या पुलाचा भराव वाहून गेला; नागरिकांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 07:26 PM2021-08-31T19:26:00+5:302021-08-31T19:27:14+5:30
Rain In Aurangabad: औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणा दरम्यान या पुलाशेजारील असलेला निझामकालीन पूल ठेकेदाराने तोडून पूर्णा नदीतील पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवल्यानेहा प्रकार घडला आहे.
सिल्लोड: जळगाव औरंगाबाद रस्त्यावरील भवन येथील जुन्या पुलाचा भराव मंगळवारी पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला.यामुळे जळगाव-औरंगाबाद रस्त्याला खालून मोठे भगदाड पडले होते. नागरिकांचे लक्ष गेल्याने त्यांनी झाडाच्या फांद्या, माती, मुरूमचा भराव टाकून पाणी दुसरीकडे वळविले. तसेच त्याबाजूची वाहतूक बंद करून दुसरीकडून वळवली. यामुळे मोठा अनर्थ टळला नसता अनेक वाहनांचा अपघात होण्याची शक्यता होती.
औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणा दरम्यान या पुलाशेजारील असलेला निझामकालीन पूल ठेकेदाराने तोडून पूर्णा नदीतील पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवल्यानेहा प्रकार घडला आहे. पूर्णा नदीच्यावरील भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडल्याने पूर्णता नदीला पूर आला या पुराचे पाणी व त्याच्या लाटा श्री इन्फ्रा प्रा. लिमिटेड कंपनीच्या ठेकेदाराने आडव्या घातलेल्या मातीच्या बांधामुळे रुद्राणी कंपनीने बांधलेल्या पुलाच्या भवन गावाच्या बाजूने धडकत होत्या. त्यामुळे त्याठिकाणी टाकलेला मातीचा भराव वाहून जाऊन जळगाव-औरंगाबाद रस्त्याला पुलाखालून मोठे भगदाड पडले.
हिरडपुरी बंधाऱ्यातून २६७६१ क्युसेस विसर्ग; अनेक गावांचा संपर्क तुटला
घटनेची माहिती मिळताच भवन येथील सोमिनाथ कळम, रमेश काकडे , भागवत काथार, दत्ता कळम, अविनाश हिवराळे, गजानन कल्याणकर , सतीश कळम, पवन शेंडे या तरुणांनी तातडीने भगदाड पडलेल्या बाजूची वाहतूक बंद केली. तसेच झाडाच्या फांद्या आणि दगड टाकून एकेरी वाहतूक सुरळीत केली. नसता अनेक वाहने खाली कोसळली असती. जुन्या पुलाच्या जागी बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या चुकीच्या पद्धतीमुळे मोठी दुर्घटना घटना होता होता टळली असे प्रत्यक्षदर्शी सोमिनाथ कळम यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम राजपूत , सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. बांध आणि चारी जेसीबीच्या सहाय्याने दुरुस्त केल्यामुळे पाण्याचा प्रवाह सरळ झाला. त्यामुळे पडलेले भगदाड माती भरून बुजविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.