औरंगाबादच्या विद्यापीठ अधिसभेच्या निवडणूकीत उत्कर्ष पॅनलची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 10:43 PM2017-11-26T22:43:21+5:302017-11-26T22:43:29+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्राध्यापक गटाचे निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर झाले.

The flourishing panel lead in Aurangabad's Vidhan Sabha's Vidhan Sabha election | औरंगाबादच्या विद्यापीठ अधिसभेच्या निवडणूकीत उत्कर्ष पॅनलची आघाडी

औरंगाबादच्या विद्यापीठ अधिसभेच्या निवडणूकीत उत्कर्ष पॅनलची आघाडी

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्राध्यापक गटाचे निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर झाले. यात एकुण १९ जागांपैकी ३ जागांवर अपक्षांनी बाजी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उत्कर्ष पॅनलला १२ आणि ‘अभाविप’ प्रणित विद्यापीठ विकास मंचला ४ जागा मिळाल्या. या निकालात आमदार सतीश चव्हाण यांच्या संस्थेचे डॉ. अविनाश येळीकर यांना धक्कादायक पराभव स्विकारावा लागला.

विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. या मतदानाच्या मतमोजणीला रविवारी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मात्र अपेक्षेप्रमाणे मतमोजणीचा वेग अतिशय मंद होता. प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापीठ प्राध्यापक गटातील ४४२ मते मोजण्यासाठी तब्बल सायंकाळचे ६ वाजले. या मतमोजणीत सुुरुवातील संस्थाचालक गटाची मतमोजणी झाली. यात उत्कर्ष पॅनलचे कपिल अकात आणि गोंविद देशमुख यांनी बाजी मारली. तर माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्या पत्नी मनिषा टोपे आणि राहुल म्हस्के हे बिनविरोध आले होते. या गटात संजय निंबाळकर आणि भाऊसाहेब राजळे या अपक्षांनी बाजी मारली. यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष आणि उत्कर्ष पॅनलचे उमेदवार डॉ. अविनाश येळीकर यांचा शेवटच्या फेरीअखेर दोन मतांनी पराभव झाला. उत्कर्ष पॅनलचे प्रमुख व मशिप्रमंचे सचिव आमदार सतीश चव्हाण यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. याशिवाय प्राचार्य गटातही विद्यापीठ विकास मंचने जोरदार मुसंडी मारत तब्बल चार जागांवर विजय मिळविला. तर उत्कर्ष पॅनलला केवळ सहा जागांवरच समाधान मानावे लागले. विद्यापीठ प्राध्यापक गटात उत्कर्ष पॅनलच्या उमेदवार डॉ. स्मिता अवचार आणि डॉ. राम चव्हाण यांनी विजय मिळविला.  तर अपक्ष उमेदवार डॉ. सतीश दांडगे यांनी बाजी मारली. या निकालामुळे काही खुशी कही गम अशी आवस्था उत्कर्ष पॅनल समर्थकांची झाली होती. 

हे उमेदवार विजयी

विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत अधिसभेच्या संस्थाचालक गटात खुल्या प्रवर्गातुन कपील अकात, गोंविद देशमुख, संजय निंबाळकर आणि भाऊसाहेब राजळे विजयी झाले. अनुसूचिज जाती प्रवर्गातुन राहुल म्हस्के तर महिलातुन मनिषा राजेश टोपे विजयी झाल्या आहेत.

प्राचार्य गटात खुल्या प्रवर्गातुन डॉ. भारत खंदारे, डॉ. अली झाकीर अब्बास अली, डॉ. अशोक पंडीत, डॉ. जयसिंग देशमुख आणि डॉ.  सुभाष टकले विजयी झाले आहेत. तर अनुसूचित जाती प्रवर्गात डॉ. कमलाकर कांबळे, अनुसूचित जमातीमध्ये  डॉ. शिवदास शिरसाठ, व्हीजेएनटी-१ मध्ये डॉ. रामचंद्रा इप्पर, इतर मागास प्रवर्गात डॉ. हरिदास विधाते आणि महिला प्रवर्गात डॉ. प्राप्ती देशमुख यांचा विजय झाला. विद्यापीठ प्राध्यापक गटात खुल्या प्रवर्गात डॉ. राम चव्हाण, अनुसूचित जाती प्रवर्गात  डॉ. सतीश दांडगे आणि महिलामध्ये डॉ. स्मिता अवचार यांनी बाजी मारली. उर्वरित महाविद्यालय प्राध्यापक आणि विद्यापरिषदेची मतमोजणी सुरु आहे.

एक-दोन मतांनी उमेदवार पराभूत

संस्थाचालक गटात उत्कर्षचे डॉ. अविनाश येळीकर दोन मतांनी पराभूत झाले. तर प्राचार्य गटातील ओबीसी प्रवर्गात उत्कर्षचे डॉ. सोपान निंभोरे हे एका मताने पराभूत झाले. विजयी उमेदवार डॉ. हरीदास विधाते यांना ५१ मते पडली. तर पराभूत डॉ. निंभोरे यांना ५० मते पडली. यात विशेष म्हणजे डॉ. निंभोरे यांना पडलेले एक मत अवैध ठरले. हे मत वैध ठरले असते तर दोन्ही उमेदवारांना समान मते पडली असती. याशिवाय एस्सी प्रवर्गात उत्कर्षच्या डॉ. अभिजित वाडेकर यांचाही दोन मतांनी पराभव झाला.

उच्चविद्याविभूषितांची मते बाद

विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानात उच्चविद्याविभूषीत समजल्या जाणा-या प्राध्यापकांची मते बाद ठरली आहेत. विद्यापीठ प्राध्यापक गटातील खुल्या प्रवर्गातील तब्बल १२ मते बाद ठरली. महिला गटातही पाच मते बाद ठरली तर अनुसूचित जाती गटातीही दोन मते बाद ठरली आहे. याशिवाय प्राचार्यांच्या गटातही एक मत बाद ठरले. उच्चविद्याविभूषित असूनही मत बाद ठरल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 निवडणूक तज्ज्ञांचे अज्ञान

विद्यापीठाच्या अधिसभा मतमोजणी ही अतिशय अवघड बाब असते. कोणत्याही वेळी गोंधळ निर्माण होऊ शकतो. यामुळे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सुनील दाते यांना बोलावले होते. संस्थाचालक गटात कपिल अकात हे निवडूण आल्यानंतर त्यांना पडलेली अधिकची चार मते कोणाला कशी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा डॉ. दाते यांनी ४ मते मोघमपणे हाताला येतील ते पुढील उमेदवारास देण्यात यावेत असे सांगितले. यामुळे मतमोजणी सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यास सर्वांनी विरोध दर्शविल्यानंतर संजय निंबाळकर यांनी त्यांनी नियम समजावून सांगितल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु झाली. याशिवाय मतमोजणी कक्षात उभा केलेला लाकडी टेबल खराब झाल्यामुळे मतमोजणी सुुरु असतानाच पडल्याची घटना घडली.

संजय निंबाळकर सहाव्यांदा विजयी

संस्थाचालक गटात संजय निंबाळकर यांनी सहव्यांदा विजय मिळविला आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत १९९१ साली पहिल्यांदा संस्थाचालक गटातुन विजय मिळविला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकदाही खंड न पडता सहा वेळा अधिसभेवर निवडूण आल्याचे अपक्ष उमेदवार संजय निंबाळकर यांनी सांगितले. राज्यातील हे ऐकमेव उदाहरण असल्याचा दावाही त्यांनी केला.

 

उमेदवारांच्या प्रतिक्रिया

- मी कोणत्याही गटाचा नाही. मला विद्यापीठातील प्राध्यापकांनी विजयी केले आहे. त्यांच्या समस्या आणि विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यासाठी माझा लढा सुरु असणार आहे.

- डॉ. सतीश दांडगे, विजयी उमेदवार

 

विद्यापीठ विकास मंच व उत्कर्ष पॅनल आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी कोणत्याही गटाचा नाही. तर अपक्ष निवडूण आलो. आता अपक्षच राहणार आहे.

- संजय निंबाळकर, विजयी उमेदवार

मागील काही दिवसांपासून विद्यापीठाच्या विकासाची गाडी गाळात रुतली आहे. त्याला चालना देण्यासाठी काम करावे लागणार आहे. याशिवाय विद्यापीठात प्रवेश घेण्याºया विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील.

- डॉ. स्मिता अवचार, विजयी उमेदवार

Web Title: The flourishing panel lead in Aurangabad's Vidhan Sabha's Vidhan Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.