शंभर एकरवर फुलशेतीचा दरवळ; गावातील महिलांची वर्षाची कमाई दीड कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 19:16 IST2024-12-27T19:15:32+5:302024-12-27T19:16:47+5:30

पारंपारिक पिकांना जोड म्हणून फुलशेती हा व्यवसाय लाभदायक आहे, यातून वर्षभर उत्पन्न घेता येते.

Flower farming flourishes on 100 acres in Shirodi of Chhatrapati Sambhajinagar Dist; 10 women's self-help groups earn Rs 1.5 crore annually | शंभर एकरवर फुलशेतीचा दरवळ; गावातील महिलांची वर्षाची कमाई दीड कोटी

शंभर एकरवर फुलशेतीचा दरवळ; गावातील महिलांची वर्षाची कमाई दीड कोटी

- रऊफ शेख

फुलंब्री: तालुक्यातील शिरोडी खुर्द परिसरात शंभर एकर क्षेत्रात फुलशेती बहरलेली आहे. यातून वर्षाला दीड कोटींचे उत्पन्न होत आहे. हो, अगदी बरोबर दीड कोटींचे उत्पन्न अन्  ही किमया साधली आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने गावातील दहा बचत गटांतील महिलांनी. 

फुलंब्री पासून १५ किमी अंतरावर असलेल्या शिरोडी खुर्द गाव आहे. या ठिकाणी पाच वर्षापूर्वी केवळ एका शेतकऱ्याने झेंडू लावून फुलशेतीस सुरुवात केली. मागील पाच वर्षात फुलशेती करण्याची जबाबदारी येथील महिला बचत गटाने स्वीकारली. सध्या परिसरात शंभर एकर शेतीत शेवंती, बिजली, झेंडू ची फुलशेती आहे. या फुलशेतीच्या माध्यमातून शेकडो कुटुंब अल्पवधीतच आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली. हा अनुभव पाहून बाकीचे शेतकरी देखील फुलशेतीकडे वळले आहेत. 

फूलशेतीमधून वर्षभर उत्पन्न 
पारंपारिक पिकांना जोड म्हणून फुलशेती हा व्यवसाय लाभदायक आहे. फुलशेतीतून वर्षभर उत्पन्न घेता येते. कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवून देते, फुलशेती उद्योगात स्थलांतर करण्याची आवश्यकता नसून गावातच पैसा मिळतो. यातून शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा अल्पवधीत सुधारतो. दिवसेंदिवस फुलांची मागणीही वाढत असल्यामुळे छोट्या फुलविक्रेत्यांपासून ते मोठ्या व्यावसायिकांचे उत्पन्न वाढत आहे.

नगदी उत्पन्न मिळते
शिरोडीमध्ये फुलशेतीला २०२१ मध्ये सुरुवात झाली. गावातील दहा महिला बचत गटातील प्रत्येक सदस्य आपल्या शेतात फुलशेती करतात. लागवडीनंतर चार महिन्यात फुले तोडणीला निघतात. छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथे बाजारपेठेत फुले विक्री करिता पाठवली जातात. फूल विक्रीतून नगदी उत्पन्न प्राप्त होते. बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आर्थिक पाठबळ मिळते. तर आम्रपाली साधन केंद्राचे तालुका समन्वयक संदीप नांदवे व लेखापाल पंडित भोकरे यांच्याकडून महिलांना मदत मिळत आहे. 

कुलिंग व्हॅन देणार
फुलशेती करणाऱ्या महिलांकडे आर्थिक सुबकता आलेली आहे. गावात मॉगनेटच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. येथील फुले देशासह विदेशात विक्रीसाठी जावई यासाठी त्यांचे ग्रेडींगकरून कुलिंग व्हॅन उपलब्ध करण्याकरिता पुढाकार घेतला आहे.
- चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ

यंदा क्षेत्र वाढवले 
मागील वर्षी केवळ १५ गुठे जमिनीत फुलशेती केली. फुलांना भाव चांगला मिळाल्याने अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा फुलशेतीचे क्षेत्र वाढविले आहे.
- रोहिणी पंडित भोकरे, सदस्य, दुर्गामाता महिला बचत गट

लाखोंचा फायदा 
परंपरागत पिकाला फाटा देऊन आम्ही चार वर्षांपासून फुलशेती करण्यास सुरुवात केली. या शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढले. शेतात घर ही बांधले आहे. आता पाच एकर शेत्रात फुलशेती आहे. भाव चांगला मिळाला तर लाखो रुपयाचा फायदा होईल. 
- मीना भाऊसाहेब भूमे, सदस्य, सूर्योदय महिला बचत गट

Web Title: Flower farming flourishes on 100 acres in Shirodi of Chhatrapati Sambhajinagar Dist; 10 women's self-help groups earn Rs 1.5 crore annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.