टँकरच्या पाण्यावर फुलविली बाग
By Admin | Published: July 17, 2014 12:47 AM2014-07-17T00:47:43+5:302014-07-17T00:58:21+5:30
कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या.
कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या. टँकरने पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला असला तरी आता बाग बहरल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
गेवराई तालुक्यातील कोळगावसह सैदापूर, माणकापूर परिसरात गेल्या काही दिवसात फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेततळे, ठिबकसह फळबागा केल्या आहेत. डाळींब, मोसंबी, आंबा आदी फळबागा शेतकऱ्यांनी लावल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसात पुरेसा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांना पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी व कुपनलिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेऊन बागा जोपासाव्या लागतात. सैदापूर येथील भगवानराव दातखिळ यांच्याकडे २५ एकरवर फळबागा आहेत. पाणी टंचाई असल्याने टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासह अरूण कांबळे, कैलास कांबळे, रामराव नरसाळे, जिजा करांडे, गणेश लोंढे, नानासाहेब गवळी, प्रल्हाद करांडे या शेतकऱ्यांनीही टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्या. यावर मोठा खर्च झाला. बागा जोपासल्याने शेतकऱ्यातून मात्र समाधान व्यक्त होते. (वार्ताहर)