औरंगाबादकरांसाठी नवीन विमानसेवा, ‘फ्लायबिग’चे १५ मेपासून हैदराबादसाठी उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 05:25 PM2022-05-02T17:25:34+5:302022-05-02T17:32:15+5:30
७२ आसनी विमानाचे सकाळच्या वेळेत ‘टेकऑफ’; हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा
औरंगाबाद : औरंगाबादहून फ्लायबिग एअरलाइन्सची विमानसेवा सुरू होण्यावर अखेर शिक्कामाेर्तब झाले आहे. फ्लायबिग एअरलाइन्सने १५ मेपासून हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे.
मुंबईत २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत फ्लायबिग आणि आकासा एअरलाइन्सच्या प्रमुखांनी औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष व उद्योजक सुनीत कोठारी यांनी गुरुवारी फ्लायबिग एअरलाइन्सचे अध्यक्ष आणि सीईओ कॅप्टन संजय मंडाविया यांच्याशी संवाद साधला. यावेळी ७२ आसनी छोट्या विमानाद्वारे (एटीआर) हैदराबाद - औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा १५ मेपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंडाविया यांनी सुनीत कोठारी यांना दिली. हे विमान सकाळच्या वेळेत उड्डाण करेल. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी फ्लायबिगसाठी तात्काळ स्लाॅट, एटीसी क्लिअरन्स मंजूर केल्याचे कोठारी यांनी सांगितले. औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे सदस्य अक्षय चाबुकस्वार म्हणाले, फ्लायबिग विमान कंपनीकडून औरंगाबाद स्टेशन सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली जात आहे. इंदूर विमानतळावरील फ्लायबिगचा काही स्टाफ औरंगाबादला स्थलांतर होईल.
असे राहील वेळापत्रक
फ्लायबिगचे विमान हैदराबादहून सकाळी ६ वाजता उड्डाण घेईल आणि सकाळी ७.२० वाजता औरंगाबादला येईल. त्यानंतर हे विमान सकाळी ७.४० वाजता औरंगाबादहून झेप घेईल आणि सकाळी ९.१० वाजता हैदराबादला पोहोचेल.
इतर शहरांसाठी विमानसेवेचीही आशा
औरंगाबादहून हैदराबादसाठी विमानसेवा सुरु केल्यानंतर फ्लायबिगकडून इतर शहरांसाठीही विमानसेवा सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. हैदराबादसाठी इंडिगोपाठोपाठ आता फ्लायबिगचा पर्याय प्रवाशांना मिळणार आहे.