डॉक्टरांच्या प्रश्नांबरोबर आरोग्य शिक्षणावर भर : सत्यनारायण सोमाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:58 PM2019-04-16T18:58:32+5:302019-04-16T19:11:01+5:30
वैद्यकीय सेवेवर परिणाम करणारा ग्राहक संरक्षण कायदा, ‘एमसीआय’ आणि ‘एनएमसी’संदर्भात नव्या सरकारकडे लक्ष
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ही सर्वात जुनी संघटना आहे. डॉक्टरांच्या प्रश्नांबरोबर निरोगी समाजासाठी लसीकरण, आजारांविषयी जनजागृती आणि आरोग्य शिक्षणासाठी ‘आयएमए’ नेहमीच प्रयत्नशील असते. याच गोष्टींना यापुढेही प्राधान्यक्रम राहील. देशातील आगामी सरकार ग्राहक संरक्षण कायदा, ‘एमसीआय’ आणि ‘एनएमसी’ यासंदर्भात काय निर्णय घेईल आणि त्याचा वैद्यकीय सेवेवर काय परिणाम होईल, त्यादृष्टीने पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असे ‘आयएमए’चे नूतन अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी म्हणाले.
औरंगाबाद शाखेच्या २०१९-२०२० च्या अध्यक्षपदी डॉ. सत्यनारायण सोमाणी यांची निवड झाली. यानिमित्त डॉ. सोमाणी यांनी विविध मुद्यांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.
ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मध्ये सुधारणा करून नोव्हेंबर २०१८ मध्ये सुधारित विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकात डिस्ट्रिक्ट फोरमला एक कोटीपर्यंत (पूर्वी दहा लाख) आणि राज्य फोरमला दहा कोटींपर्यंत दंड ठोठाविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या बिलासाठी डॉक्टरांच्या बाजूचा कोणताही विचार करण्यात आलेला नसल्याचे ‘आयएमए’ने म्हटले.
याविषयी डॉ. सोमाणी म्हणाले की, हे सुधारित विधेयक अद्याप पास झालेले नाही. त्यामुळे हा कायदा आलेला नाही. याचबरोबर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) विधेयक येऊ घातले आहे. ‘एनएमसी’मध्ये डॉक्टर नको आहेत. लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्तींचा त्यात समावेश करण्यावर भर आहे. त्यामुळे नेमका काय फरक पडेल, हे सध्या सांगता येत नसले तरी निश्चित कोणत्या ना कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल. यासंदर्भात ‘आयएमए’ची केंद्रीय समिती काम करीत आहे. या दोन्ही बाबींसंदर्भात येणारे सरकार काय करते, हे पाहावे लागेल, असे डॉ. सोमाणी म्हणाले. शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर ‘आयएमए’देखील नेहमीच प्रयत्नशील असते. बालकांच्या लसीकरणाचे महत्त्व, स्वत:च्या आरोग्याची काळजी यासंदर्भात जनजागृती करणे हा अग्रक्रम आहे, असेही ते म्हणाले.
अवैध प्रॅक्टिस करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
शहरात अवैध गर्भलिंगनिदान करणारे डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. रुग्णसेवा देणारे डॉक्टर चुकीची प्रॅक्टिस करताना सापडतात, याविषयी डॉ. सोमाणी म्हणाले की, अशा डॉक्टरांना ‘आयएमए’ कधीही पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर हा सुशक्षित आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अशा गोष्टींपासून स्वत:च दूर राहिले पाहिजे.
नेत्रदान केले, तरच अंधांना दृष्टी
देशात अंध व्यक्तींची संख्या मोठी आहे. जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान केले, तरच त्यांना दृष्टी मिळू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानाने चार लोकांना नवीन आयुष्य मिळते. रक्तदानही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या गोष्टींवरही भर दिला जाणार आहे, असेही डॉ. सत्यनारायण सोमाणी म्हणाले.