पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागल्यावर मराठा आंदोलनावर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:04 AM2021-07-30T04:04:16+5:302021-07-30T04:04:16+5:30
औरंगाबाद : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधील पूरग्रस्तांचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. अशावेळी आंदोलन करणे योग्य नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न ...
औरंगाबाद : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामधील पूरग्रस्तांचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. अशावेळी आंदोलन करणे योग्य नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न एकदा मार्गी लागल्यावर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी लोकमतला दिली.
मराठा समाजाच्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाला एक महिना मुदत देत संभाजीराजे यांनी मूक आंदोलन पुढे ढकलले होते. ही मुदत संपण्याच्या २ दिवस आधी १५ जुलै रोजी खा. संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले आणि आंदोलनाचा इशारा दिला होता.
१७ जून रोजी मुंबईत आंदोलक आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि अन्य अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनाने सत्कारात्मक प्रतिसाद दर्शविला होता. यावेळी मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अवधी मागितला होता. राज्य शासनाच्या विनंतीनुसार मूक आंदोलन एक महिना स्थगित केले होते. ही मुदत १७ जुलै रोजी समाप्त झाली. एक महिन्याच्या मुदतीनंतरही मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. या पार्श्वभूमीवर खा. संभाजी राजे यांनी १५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. याविषयी खा. संभाजीराजे यांनी सांगितले की, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर बऱ्यापैकी कार्यवाही सुरू केली. सध्या पूरग्रस्तांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माणसांच्या जीवापेक्षा काहीही मोठे नाही. यामुळे पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागल्यावर मराठा आंदोलनाचा विषय हाती घेणार आहे.
---------------------
कोट
९ ऑगस्टपूर्वी राज्यव्यापी बैठक
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्टपूर्वी राज्यव्यापी बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.
- आप्पासाहेब कुढेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, औरंगाबाद.