‘मेडिकल’ परवाने देण्यावरच ‘फोकस’; फक्त ५ अधिकारी, बनावट औषधी कशी सापडतील?

By संतोष हिरेमठ | Updated: December 10, 2024 19:53 IST2024-12-10T19:52:56+5:302024-12-10T19:53:25+5:30

औषधींचे ऑपरेशन: जिल्ह्यात ८ वर्षांत दुप्पट ‘मेडिकल’ : परवाने देण्यावरच ‘फोकस’, औषध प्रशासनाकडून नावालाच तपासणी

'Focus' on 'Medical shop' Licensing; Only 5 officers, how to find fake medicine? | ‘मेडिकल’ परवाने देण्यावरच ‘फोकस’; फक्त ५ अधिकारी, बनावट औषधी कशी सापडतील?

‘मेडिकल’ परवाने देण्यावरच ‘फोकस’; फक्त ५ अधिकारी, बनावट औषधी कशी सापडतील?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या ८ वर्षांत औषधी दुकानांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्या उलट औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी होत गेली आहे. आजघडीला केवळ दुकानांना परवाने देण्याचेच काम औषध प्रशासन करीत आहे. औषधी आणि मेडिकल स्टोअर्सच्या तपासणीचे काम नावालाच सुरू असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बनावट औषधी कशी सापडतील, असा सवाल आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधींचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे ‘मेडिकल’मध्येही बनावट औषधींचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु औषध प्रशासन आणि औषधांची तपासणीची स्थिती पाहता सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे.

असा चालतो कारभार
अन्न व औषध प्रशासन (औषध) कार्यालयात २ सहायक आयुक्त आणि ३ औषध निरीक्षक, या ५ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सध्या कारभार सुरू आहे. यातील एका सहायक आयुक्तांकडे रिक्त असलेल्या सहआयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. सहआयुक्त म्हणून संपूर्ण मराठवाड्याचा कारभार त्यांना पाहावा लागतो. प्रत्येक औषध निरीक्षकांकडे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील कारभार आहे. औषध निरीक्षकांची मंजूर पदांची संख्या ८ आहे.

महिन्याला १० तपासणीचे ‘टार्गेट’, पण...
औषध निरीक्षकांना प्रत्येक महिन्याला १० औषध दुकानांची तपासणी करण्याचे आणि नियमांचे पालन होत असल्याबाबत, तसेच तपासणीसाठी औषधी नमुने घ्यावे लागते. मात्र, निरीक्षकांची संख्या पाहता ही तपासणी पूर्ण क्षमतेने होत नाही.

रिॲक्शन, तक्रारीनंतरच तपासणी
एखाद्या औषधीमुळे रिॲक्शन आली, रुग्णाकडून काही तक्रार आली तरच रुग्णालयाकडून औषधी तपासणीसाठी औषध प्रशासनाकडे दिली जाते.

ना फायदा, ना नुकसान
बनावट औषधींतील घटकांमुळे आजार बराही होत नसेल आणि औषधींचा काही दुष्परिणामही होत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी कोणाकडून काही तक्रार येण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रत्येक औषधीची तपासणी होणे गरजेचे आवश्यक असल्याचे घाटीतील सूत्रांनी सांगितले. मात्र, नेहमीच मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगून औषध प्रशासन मोकळे होते.

सर्व नमुने ‘ओके’, ‘रिॲक्शन’ आलेलेही प्रमाणित
जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांतून गेल्या वर्षभरात १३ औषधींची तपासणी करण्यात आली. ही सर्व औषधी प्रमाणित असल्याचा अहवाल आला. विशेष म्हणजे रिॲक्शन आलेल्या रेबीज लसीचा अहवालही प्रमाणित आले. कांचनवाडी परिसरात अन्न व औषध प्रशासन (औषध) कार्यालयात औषध चाचणी प्रयोगशाळा आहे. याठिकाणी काही औषधींची तपासणी होते, तर काही औषधींची मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणी होते.

औषध प्रशासनाचे कानावर हात
औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता यासंदर्भात त्यांनी बोलण्यास नकार दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थिती
- २०१६ मध्ये औषधी दुकाने : ३,००५
- २०२४ मध्ये औषधी दुकाने : ६,२१९
- ग्रामीण भागातील औषधी दुकाने : ३,२२५
- शहरातील औषधी दुकाने : २,९९४

Web Title: 'Focus' on 'Medical shop' Licensing; Only 5 officers, how to find fake medicine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.