विज्ञान, गणिताकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:05 AM2021-02-13T04:05:36+5:302021-02-13T04:05:36+5:30
--- औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी नंद्राबाद, वेरुळ ...
---
औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी नंद्राबाद, वेरुळ (ता. खुलताबाद), जैतापूर (ता.कन्नड) येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षणाची माहिती घेत विज्ञान व गणिताकडे अधिक लक्ष देण्याच्या सुचना केंद्रेकर यांनी दिल्या.
शाळांची रंगरंगोटी करुन त्या बोलक्या करा, प्रयोगशाळांचा जास्तीत जास्त वापर करा, विद्यार्थी ग्रंथालयाकडे वळतील याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे तसेच क्रीडांगणांवर सोयीसुविधा वाढवण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांनी शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या. इंड्युरंस कंपनीच्या सीएसआर फंडातून बांधलेल्या वेरुळ येथील केंद्रीय शाळेच्या इमारतीला भेट देत चांगल्या प्रतिचे काम झाल्याबद्दल केंद्रकेर यांनी समाधान व्यक्त केले. जैतापूरच्या शाळेत डेन्सफाॅरेस्टच्या प्रकल्पाला अधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी हाॅलीबाॅल कोर्ट तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, गट शिक्षणाधिकारी सचिन सोळंकी, विस्तार अधिकारी विलास केवट, कल्पना पतकोंडे यांच्यासह अधिकारी यावेळी पाहणी दौऱ्यात होते.