दुष्काळात चारा मिळेना
By Admin | Published: April 23, 2016 11:48 PM2016-04-23T23:48:18+5:302016-04-23T23:57:15+5:30
नांदेड : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़
नांदेड : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेने शासनाकडे मागणी केलेला १ लाख ३४ हजार ९६० मे़ टन चारा अद्याप उपलब्ध झाला नसल्याने साडेआठ लाख जनावरांची मे महिन्यात होरपळ होणार आहे़
जिल्ह्यात चाऱ्याअभावी पशुधन संख्या घटत असल्याचे भयावह चित्र पाहण्यास मिळत आहे़ जनावरांना हिरवा व वाळलेला चारा मिळणे दुरापास्त झाले आहे़ पशुखाद्य म्हणून ज्वारीचा कडबा, सोयाबीनचे भुसकट या पिकांमध्ये झालेली घट व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविणे कठीण झाले आहे़
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची मागणी शासनाकडे केली होती़ मात्र दोन महिने झाले तरी चाऱ्याच्या मागणीवर शासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही़ त्यामुळे चारा मिळणार की नाही, हा प्रश्न पशुपालकांना पडला आहे़
जिल्ह्यात लहान जनावरे २ लाख ९४३ तर मोठे जनावरे ६ लाख ४९ हजार ३०७ आहेत़ प्रतिलहान जनावराला प्रतिदिवस ३ किलो चारा याप्रमाणे ६ लाख २ हजार ८२९ किलो तर मोठ्या जनावराला ३८ लाख ९५ हजार ८४२ किलो चाऱ्याची आवश्यकता आहे़ त्यानुसार प्रति दिन ४४९८़६७१ मे़ टन तर तीन महिन्यांसाठी १३४९६०़१३ मे़ टन चारा आवश्यकता आहे़
१ नोव्हेंबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत २९२४१३़६२ मे़ टन चारा वापरात आला आहे़ लहान जनावरांना दररोज तीन किलो प्रमाणे ६०२ टन तर मोठ्या जनावरांना दर दिवशी सहा किलोप्रमाणे साडेतीन हजार टन चारा लागतो़ याप्रमाणे दररोज साडेचार हजार टन चारा लागतो, तर दर महिन्याला १ लाख ३४ हजार ९६० टन चाऱ्याची आवश्यकता आहे़ पुढील दोन महिने जनावरांना जगविण्यासाठी मुबलक प्रमाणात चारा आवश्यक आहे़
यासंदर्भात जि़ प़ चे पशुसंवर्धन अधिकारी एम़ यु़ गोहत्रे म्हणाले, मागणी केलेला चाऱ्याची पूर्तता अद्याप झाली नाही़ मात्र शनिवारी झालेल्या विभागीय बैठकीत चाऱ्याच्यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे़ (प्रतिनिधी)