छावणी रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिस्त पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:52+5:302020-12-17T04:33:52+5:30
वाळूज महानगर : उद्योजकांच्या पाठपुराव्यानंतर छावणी उड्डाणपुलावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी पुढाकार घेतला ...
वाळूज महानगर : उद्योजकांच्या पाठपुराव्यानंतर छावणी उड्डाणपुलावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी पुढाकार घेतला आहे. उद्योजक संघटनांचे पदाधिकारी व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करुन पुलावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी उपाययोजना आखल्या.
औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी रेल्वे पुलाचे काम कासवगतीने सुरु आहे. या पुलावर दररोज सकाळी व सायंकाळी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या उद्योजक, कामगार, प्रवासी व वाहनधारकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सीआयआय, मसिआ व सीएमआयए या उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१४) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर आयुक्तांनी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी छावणी व वाळूज वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. वाहतूक शाखेने या पुलावर मंगळवारी बॅरिकेटस् उभारले व पोलीस कर्मचारी नेमून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्दळ मोठी असल्याने बॅरिकेटसमुळे अधिकच वाहतूक कोंडी होऊ लागल्याने हा प्रयोग अयशस्वी ठरला. बुधवारी सायंकाळी सीआयआयचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, सचिव राहुल मोगले, सुमीत मालानी, सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धूत, सचिव सतीश लोणीकर, बिमटाचे अध्यक्ष मिलिंद थोरात, वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके, छावणी वाहतूक शाखेचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे आदींनी या पुलाची पाहणी करून विविध उपाययोजना आखल्या.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सूचना
उद्योजक व वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेत पुलावरुन प्रवास करतांना सर्व वाहनधारकांनी लेनची शिस्त पाळावी, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कंपन्यांनी शिफ्टच्या वेळेत ठराविक अंतर ठेवून टप्या-टप्याने बस सोडाव्यात, सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, सातारा व रेल्वे स्टेशन परिसरातील कामगार व उद्योजकांनी लिंकरोडमार्गे ये-जा करावी, पुलावरुन ओव्हरटेक करु नये, वाहतूक नियमाचे पालन करावे अशा उपाययोजना आखल्या आहेत. या संदर्भात कंपन्या व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनाही विविध सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. छावणी पुलाचे काम वर्षभर चालणार असल्यामुळे वाहनधारकांनी शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो ओळ- छावणी उड्डाणपुलावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पाहणी करतांना उद्योजक संघटनांचे पदाधिकारी व वाहतूक शाखेचे अधिकारी.
फोटो क्रमांक- पूल १/२
----------------------