अन्न शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांच्या परिषदेची जोरदार तयारी
By Admin | Published: December 16, 2015 11:24 PM2015-12-16T23:24:25+5:302015-12-16T23:33:14+5:30
परभणी : येथील कृषी विद्यापीठामध्ये १८ व १९ डिसेंबर रोजी अखिल भारतीय स्तरावरील अन्न शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची १४ वी परिषद होत आहे़
परभणी : येथील कृषी विद्यापीठामध्ये १८ व १९ डिसेंबर रोजी अखिल भारतीय स्तरावरील अन्न शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची १४ वी परिषद होत आहे़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्न तंत्र महाविद्यालय आणि म्हैसूर येथील अ़भा़ अन्न शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळाच्या वतीने ही परिषद घेतली जात आहे़
कृषी प्रक्रिया व शाश्वत तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण या विषयावर आधारित ही परिषद आहे़ म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था आणि डिफेन्स फूड रिसर्च लायब्रोटरी हे परिषदेचे सहसंयोजक आहेत़ कृषी उत्पादित माल नाशवंत व हंगामी स्वरुपाचा असल्याने त्याची उपलब्धता विशिष्ट काळात होत असते़ काढणी तंत्रज्ञानाचा अभाव, प्रक्रिया व साठवणुकीच्या अपुऱ्या सोयीमुळे उत्पादीत कृषी मालाचे मोठे आर्थिक नुकसान होते़ हे दृष्ट चक्र थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनीच आपल्या उत्पादीत मालावर प्रक्रिया करून त्यापासून मूल्यवर्धित व प्रक्रिया युक्त अन्नपदार्थाची निर्मिती केली तर शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो़ मराठवाड्यात शेतीला पुरक जोड धंद्याशिवाय गत्यंतर नसून अन्न प्रक्रिया उद्योगाची कास शेतकऱ्यांना धरावी लागणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्योजकता विकसित होण्यास चालना मिळावी, या मूळ उद्देशातूनच अन्न प्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचे आयोजन केले आहे़ यामुळे अन्नप्रक्रियाबाबतचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ओळखता येणार आहे़ या प्रदर्शनित अन्नप्रक्रिया, काढणी पश्चात तंत्रज्ञान, विपणन व्यवस्था यावर भर राहणार आहे, असे कृषी विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)