जिंतुरात अन्नसुरक्षा योजना दलालांच्या घशात
By Admin | Published: February 24, 2016 11:54 PM2016-02-24T23:54:17+5:302016-02-24T23:57:21+5:30
परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी दलालांनाच अधिक होत आहे़
परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी दलालांनाच अधिक होत आहे़ त्यामुळे ही योजना जिंतूर तालुक्यात तरी दलालांनीच घशात घातली असून, अन्नदाता शेतकरी मात्र अन्नधान्यापासून वंचित राहिला आहे़
जिंतूर तालुक्यात ६० हजार ७१९ शेतकऱ्यांना दरमहा २ हजार क्विंटल गहू व तांदळाचे वाटप होते़ परंतु, प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत हे धान्य पोहचत नाही़ तालुक्यातील १७० गावांमध्ये २०६ दुकानांद्वारे अन्नसुरक्षा योजनेतील धान्याचे वाटप केले जाते़ जिंतूर शहरात १ हजार १३३ कार्डधारक असून, ५ हजार ३५२ शेतकरी योजनेचा लाभ घेतात़ उर्वरित तालुक्यात ११ हजार ३४० कार्डधारक असून, ५५ हजार ३३७ शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत़ योजनेद्वारे ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वाटप केला जातो़
दरमहा साधारणत: १८०० क्विंटल गहू व १२०० क्विंटल तांदळाचे वाटप होत़े़ मात्र या योजनेचे फलित काय? हे गुलदस्त्यात आहे़ कारण तालुक्यातील अनेक शेतकरी लाभार्थी अजूनही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत़ ज्या लाभार्थ्यांची नावे यादीत आहेत़ त्यांच्यापर्यंत धान्य पोहचत नाही़ परिणामी ही योजना स्वस्तधान्य दुकानदार व दलालांच्या फायद्याची ठरत आहे़ (वार्ताहर) (क्रमश:)