४-५ पट उर्जावाढीसाठी एकात्मिक धोरण, नियोजनाने मार्गक्रमण गरजेचे- डॉ. अनिल काकोडकर
By योगेश पायघन | Published: November 27, 2022 04:20 PM2022-11-27T16:20:40+5:302022-11-27T16:20:58+5:30
अक्षय उर्जेतून सर्व समस्या सुटतील हा भ्रम, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे मत
औरंगाबाद: ‘अधिक उर्जा निर्माण करून लोकांचे जिवनमान उंचावणे आणि कार्बन उत्सर्जन न करणारी उर्जेची साधणे वापरून ४ ते ५ पट उर्जा वृद्धी करण्याचे मुख्य आव्हान देशासमोर आहे. सौरउर्जा, पवन उर्जा या अक्षय उर्जा स्त्रोतांमुळे सर्व समस्या सुटतील हा एक भ्रम आहे. आज आपण जितकी उर्जा वापरतो. ती गरज कदाचीत अक्षय उर्जेतून भागेल. मात्र, ४-५ पट उर्जा वाढीची गरज अक्षय उर्जेतून साध्य होण्याची सद्य परिस्थिती नाही. त्यामुळे अणुउर्जेचा भारतातील प्रसार वाढवणे गरजेचे आहे. तसेच देशात एकुण उर्जावाढीसाठी एकात्मिक धोरण ठरवून नियोजनाने मार्गक्रमन व्हायला पाहीजे.’ असे शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.
औरंगाबाद येथे रविवारी एमजीएम विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. अनिल काकोडकर म्हणाले,‘आपण उर्जा किती वापरतो आणि आपला जीवनस्थर काय याचा जवळचा संबंध आहे. आज आपण जेवढी सबंध उर्जा वापरतो. त्यात ४-५ पट वृद्धी गरजेची आहे. उर्जावाढीसाठी केवळ उपलब्ध बचत करून भागणार नाही. उर्जेतील वाढ आणि बचत यात आपण गल्लत नको. हा प्रश्न जगातील इतर देशांपेक्षा भारतापुढे गंभीर आहे. भारताच्या अतीरीक्त उर्जेच्या गरजेपेक्षा चीनची गरज तुलनेत कितीतरी कमी आहे. त्यामुळे भारताचे आव्हान चीनपेक्षा कितीतरी मोठे आहे. ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंजिंग दुसरे आव्हान आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी करून शुन्यावर नेण्याचे आव्हान आपण स्विकरले आहे.
ग्रीन एनर्जीकडे जातांना आज वापरातील उर्जेत सामान्यत: वीजेचे प्रमाण २० टक्के आहे. स्वच्छ उर्जेत सौर, पवन उर्जेची नवे साधणे आहेत. त्यातून पहिल्यांदा वीज निर्माण होऊन त्या उर्जेचे रूपांतर विविध उर्जेत करता येते. पुर्वी कोळसा, तेल निर्माण करून त्याचे रुपांतर वीजेत केले जायचे. आता हे उलटे होईल. पहिल्यांदा वीज निर्मीती त्यातून गरज भागवा नाहीतर त्याचे रुपांतर आवश्यक उर्जेत करा. केवळ वीजेने सर्व कामे होणार नाहीत. उद्योगांना उष्णता, हायट्रोजन, अमोनिया लागते. आपल्याला आता ग्रीन हायट्रोजन पाहीजे. त्यासाठी उलटा द्रावीडी प्राणायाम सुरू होईल. यात अनेक तंत्रज्ञान, किंमतीचे विषय आहेत. जर हायट्रोजनची निर्मीती वीजेच्या माध्यमातून करण्याचे झाल्यास वीजेचे प्रमाण एकुण उर्जेत जे २० टक्के आहे ते ८० टक्के होईल. त्यासाठी ग्रीड, ते स्थिर करण्यासाठीचा खर्च असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांना उत्तरे शोधतांना एकात्मिक दृष्टी पाहीजे. कंपनी, वेंडर्स वेगवेगळ्या पद्धतीने दबाव निर्माण करतात. त्यानुसार धोरण बनते. तसे होऊन नये. एकुण उर्जेची एकात्मिक धोरण ठरवून त्याचे नियोजन व्हायला पाहीजे.’ असे काकोडकर म्हणाले,
देशी तंत्रज्ञानावर मार्गक्रमनाला गती हवी
अणूउर्जेची उपलब्धी १०० ते २०० पटीने वाढायला पाहीजे. हे २०७० पर्यंत हे साध्य करणे चॅलेंज आहे. ते अश्यक्य नाही. आपल्या इथे सर्व काम हळू हळू चालते. कितीही किंमत देवून रिॲक्टर आयात करण्याला अर्थ नाही. देशी रिॲक्टर निर्मीतीमध्ये किंमत अर्धी होते. तशी व्यवस्था आपण निर्माण केली असून त्यामुळे पुढील मार्गक्रमण देशी तंत्रज्ञानावर मार्गक्रमण करतांना त्याला गती आली पाहीजे. जैतापुर प्रकल्पाला लागणाऱ्या जागेचे भूसंपादन पुर्ण झाले आहे. म्हणजे लोकांचा विरोध नाही असे म्हणणे चुकीचे होईल. तरीही तो प्रकल्प पुढे जात नाही. त्या प्रकल्पाच्या किंमतीचे गणित ज्या दिवशी बसेल. तेव्हा तो प्रकल्प पुर्ण होईल. असेही ते म्हणाले.
आव्हान स्विकारले तर साध्य करू
देशात एवढे टॅलेंट आहे. त्यामुळे कुठलेही आव्हान स्विकारले तर ते साध्य करू शकू. कार्बन उत्सर्जन शुन्यावर आणणे आणि आपल्याला अणूउर्जेच्या गरजेची जाण झाली आहे. पुढारलेल्या देशाप्रमाणे जीवनमान उंचावण्याचे ध्येय आपण ठेवले आणि अणूउर्जेची कास धरली तर आपण या दुहेरी आव्हानांवर मात करू असे ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अणुउर्जा प्रकल्प, सौरउर्जा प्रकल्पापेक्षा चौपट वीजनिर्मीती करतो. अणूउर्जे प्रकल्पाची उत्पादकता ८० टक्के तर सौरउर्जेचा २० टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे मेगावॅट पेक्षा प्रतियुनीट तुलना केल्यास अनुउर्जा प्रकल्प स्वस्त ठरतात. असेही त्यांनी सांगितले.