धनुष्यबाण, मशाल, पतंगावरून ‘सट्टा’बाजार गरम; सट्टेबाजांच्या यादीत मराठवाड्यातील कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:31 AM2024-05-20T11:31:29+5:302024-05-20T11:32:33+5:30
भुमरे, जलील, खैरे तिघांच्या नावांवर बुकींकडे अनेकांनी लावला पैसा
छत्रपती संभाजीनगर : निवडणुका, क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ असो, त्याचे कनेक्शन सट्टाबाजाराशी असतेच. गुन्हेगारी जगाशी कनेक्ट असलेले हे ‘अर्थकारणा’चे विश्व राजकारणाशी फारच घनिष्ठ संबंध ठेवून आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी ‘सट्टा’बाजार गरम झाला आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या नावांवर अनेकांनी बुकींकडे पैसे लावले आहेत. धनुष्यबाण, मशाल आणि पतंगावरून सट्टाबाजार ४ जूनपर्यंत आणखी गरम होईल. ब्लॅक मार्केटमधील समांतर अर्थव्यवस्था म्हणून सट्टाबाजाराकडे पाहिले जाते. सट्टा हा अंदाज बांधणारा जुगार आहे. यामध्ये नशिबाच्या आणि विश्लेषणाच्या जोरावर अनेक जण लाखो रुपये लावतात. यात रातोराहोण्याची चिन्हेत काही मालमाल, तर अनेक जण कंगाल होतात.
सुरुवातीला काय होता भाव...
१३ मे रोजी मतदान झाल्यानंतर सट्टाबाजारामध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे फेव्हरेट होते. सटोडियांनी भुमरे विजयी होणार यासाठी १ हजार रुपये लावणाऱ्यास ६०० रुपये भाव दिला होता. त्यावेळी खा. जलील यांच्या नावावर व खैरे यांच्या नावावर सट्टा लावण्याचे प्रमाण कमी होते. जलील यांना दीडपट, तर खैरे यांना एकपट भाव होता. ज्याचा भाव कमी त्याची विजयाची हमी, असे सूत्र सट्टाबाजारात असते. फेव्हरेट हा सट्टाबाजारातील प्रचलित शब्द आहे.
फेव्हरेटच्या यादीत तिघेेही...
१३ मेनंतर भुमरे यांचे नाव ‘सट्टा’बाजारात फेव्हरेट होते. आता खैरे व जलील यांचेही नाव फेव्हरेटच्या यादीत आल्याने विजयी कोण होणार याची उत्सुकता आहे. भुमरे, खैरे, जलील यांच्या नावे लावला जाणाऱ्या सट्ट्याचा भाव सारखा झाला आहे.
सध्या काय आहे ताजा भाव...
मतदान केंद्रनिहाय मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर मार्केटमध्ये विश्लेषणबहाद्दरांमुळे सट्टाबाजाराचे अर्थकारण बदलले आहे. सध्या भुमरे, जलील, खैरे या तिन्ही उमेदवारांना पसंती असून, प्रत्येकाच्या नावावर सट्टा लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तिघांच्या नावांवर प्रत्येकी १ हजार रुपये गुंतवल्यास १ हजार रुपये अधिकचे मिळतील, असा रविवारचा ताजा भाव असल्याची चर्चा सुरू आहे.
मराठवाड्यातील या जागांसाठीही सट्टा
मराठवाड्यातील जालना आणि बीड मतदारसंघांच्या निकालावरूनही सट्टाबाजारात दणकावून पैसा लावल्याची चर्चा आहे. जालन्यातून महायुतीचे उमेदवार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्यात जोरदार लढत होणार असल्याची चर्चा आहे. बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यातही सट्टाबाजारात काँटे की टक्कर आहे.