उमेदवारीसाठी लोकसभेला रस्सीखेच; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभेला काय होणार?
By विकास राऊत | Published: May 30, 2024 08:21 PM2024-05-30T20:21:40+5:302024-05-30T20:22:01+5:30
महायुती, महाविकास आघाडीत जागा वाटप जमले नाही तर बंडखोरीची शक्यता
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लाेकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच झाली. तसेच शिवसेना ठाकरे गटातही उमेदवारीसाठी स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुका ऑक्टोबर २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी आणि जागा सुटण्यासाठी रस्सीखेच झाल्यामुळे विधानसभेला मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना सर्व राजकीय पक्षांना करावा लागेल, अशी चर्चा आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागांवरून आतापासूनच दावा केला जात आहे. युती व आघाडीमध्ये जागा वाटप समाधानकारक होत असेल तर ठीक अन्यथा सगळेच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ
विधानसभा ........ सध्याचे आमदार........... पक्ष
सिल्लोड..........अब्दुल सत्तार..................शिवसेना
फुलंब्री...........हरिभाऊ बागडे..............भाजपा
पैठण..........संदीपान भुमरे...............शिवसेना
गंगापूर..........प्रशांत बंब.................भाजप
वैजापूर..........रमेश बोरनारे.............शिवसेना
कन्नड..........उदयसिंग राजपूत..........शिवसेना
औरंगाबाद पूर्व.........अतुल सावे...........भाजपा
औरंगाबाद मध्य........प्रदीप जैस्वाल.........शिवसेना
औरंगाबाद पश्चिम.........संजय शिरसाट.........शिवसेना
राज्यात जिल्ह्याला तीन मंत्रिपदे
राज्यात जिल्ह्यास तीन मंत्रिपदे आहेत. त्यात औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आ.अतुल सावे हे गृहनिर्माण खात्याचे मंत्री आहेत. पैठणचे संदीपान भुमरे रोहयो तर सिल्लोडचे अब्दुल सत्तार हे पणनमंत्री आहेत.
कोणाचा किती जागांवर दावा?
महाविकास आघाडी
काँग्रेसचा तीन जागांवर दावा : काँग्रेसला महाविकास आघाडीत किमान ३ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
शरद पवार गटाचा तीन जागांवर दावा : पवार गटाला दोन जागा सुटतील, यासाठी आतापासून मागणी सुरू आहे.
ठाकरे सेनेचा चार जागांवर दावा : ठाकरे सेनेला जिल्ह्यात चार जागांची अपेक्षा आहे. त्यांचा एक आमदार जिल्ह्यात आहे.
भाजप-सेना महायुती
भाजपचा पाच जागांवर दावा : भाजपाचे तीन आमदार असून दोन जागा शिल्लक मिळाव्या, यासाठी चर्चा सुरू आहे.
शिंदेसेनेचा पाच जागांवर दावा : शिंदे सेनेचे पाच आमदार आहेत, त्या सगळ्या जागा त्यांनाच मिळतील, असा दावा आहे.
अजित पवार गटाचा पाच जागांवर दावा : पवार गटाला किमान एक जागा तरी मिळावी, यासाठी मागणी होत आहे.
जिल्हाप्रमुख काय म्हणतात?
कल्याण काळे, काँग्रेस जिल्हाप्रमुख : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच विधानसभा जागा वाटप, मागणीचा विचार सुरू होईल.
पांडुरंग तायडे, शरद पवार गट जिल्हाप्रमुख : महाविकास आघाडीमध्ये किमान तीन जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी असेल.
राजू राठोड, ठाकरे सेना जिल्हाप्रमुख : पाच जागा तरी वाटाघाटीत ठाकरेसेनेला मिळतीलच. पण निर्णय वरिष्ठांच्या चर्चेअंती होईल.
संजय खंबायते, भाजप जिल्हाप्रमुख : महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला किमान पाच जागा सुटाव्यात. तीन जागा तर आमच्याकडे आहेतच.
रमेश पवार, शिंदेसेना जिल्हाप्रमुख : पाच जागा तर आहेत, आणखी दोन जागांची आमची मागणी असेल. आमचे संघटन जिल्ह्यात वाढले आहे.
कैलास पाटील, अजित पवार गट जिल्हाप्रमुख : गेल्या विधानसभेत पाच जागा लढविल्या होत्या. यावेळी त्या जागांसह मागणीचा विचार करू.