अनेकांना 'सपनो को आशियाना' दूरच; छत्रपती संभाजीनगरात ७ हजार ते ५० हजारांपर्यंत घरभाडे
By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 18, 2024 18:07 IST2024-01-18T18:07:49+5:302024-01-18T18:07:57+5:30
शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणारी कुटुंबे काही दिवस भाड्याने राहतात व नंतर याच शहरात स्थायिक होतात.

अनेकांना 'सपनो को आशियाना' दूरच; छत्रपती संभाजीनगरात ७ हजार ते ५० हजारांपर्यंत घरभाडे
छत्रपती संभाजीनगर : घराचे भाडे भरण्यापेक्षा गृहकर्ज घेऊन ईएमआय भरलेला उत्तम, असे मानले जात असले, तरी शहरात घर भाड्याने घेऊन राहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. भाडेकरू ७ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत घरभाडे देत आहेत.
कोणत्या भागात किती घरभाडे?
परिसर घरभाडे
१) चिकलठाणा : ३० हजार ते ५० हजार रु.
(प्राईम लोकेशन)
२) सिडको- हडको : ७ हजार ते २० हजार रु.
३) एन ३, एन ४, एन १ : २५ हजार ते ४० हजार रु.
४) पुंडलिकनगर : ७ हजार ते १५ हजार रु.
५) जवाहर कॉलनी : १५ हजार ते ३० हजार रु.
६) बीड बायपास : ७ हजार ते ३० हजार रु.
७) पैठण रोड : ५ हजार ते २५ हजार रु.
कोण राहतात भाड्याने?
यात सरकारी कर्मचारी, अधिकारी घर भाड्याने घेऊन राहतात. कारण त्यांच्या बदल्या होत असतात. त्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी, अधिकारी, स्थलांतरित कामगारवर्ग, काही व्यापारी, कंपन्यांतील अधिकारी यांचा समावेश असतो.
कॉलेजमुळे वाढले घरभाडे
शहरात मेडिकल, इंजिनिअरिंगचे कॉलेज, क्लासेसची संख्या मोठी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, बाहेरील जिल्ह्यांतील विद्यार्थी, असे येथे उच्च शिक्षणासाठी येतात. ते कॉलेज, क्लासेसच्या आसपासच्या परिसरात रूम भाड्याने घेऊन राहतात. यांची संख्या वाढत असल्याने घरमालक, खासगी होस्टेलवाले दरवर्षी ५ ते १० टक्क्यांनी भाडे वाढवितात.
मुलांसाठीच घर भाड्याने नाही
सिडको, औरंगपुरा, उस्मानपुरा, छावणी, बेगमपुरा या भागात घरांवर पाट्या लागल्या आहेत. ‘येथे फक्त कॉलेजच्या मुलांना खोली/ घर भाड्याने देण्यात येईल’.
घरभाड्यापेक्षा ईएमआय भरलेला बरा
शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणारी कुटुंबे काही दिवस भाड्याने राहतात व नंतर याच शहरात स्थायिक होतात. घरभाडे भरण्यापेक्षा बँकेचा ईएमआय भरून स्वतःच्या घरात राहणे पसंत केले जात असल्याने रिअल इस्टेटमध्ये दरवर्षी फ्लॅट, रो-हाऊस, बंगला विक्रीचे नवनवीन विक्रम स्थापित होत आहेत; मात्र भाड्याने घर घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.
- अमोल ठाकूर,एजंट