विद्यार्थ्यांची सुरक्षा: ठाण्याच्या हद्दीतील शाळा पोलिस अधिकारी, अंमलदारांना दिल्या दत्तक
By सुमित डोळे | Published: October 14, 2024 06:58 PM2024-10-14T18:58:33+5:302024-10-14T19:01:09+5:30
सातारा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : शाळेच्या आवारात तक्रारींसाठी स्कॅन कोड, तक्रार पेटी, अंमलदार करणार नियमित पाहणी
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळा प्रत्येक अंमलदाराला दत्तक देण्यात आली आहे. त्या शाळांमध्ये एक तक्रार पेटी, आवारात स्कॅन कोड बसविण्यात आला असून हे अंमलदार नियमित शाळेला भेट देऊन पेटी तपासतील. त्याशिवाय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. सातारा पोलिसांनी गेल्या सात दिवसांपासून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महिला, तरुणींसोबत छेडछाड, अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली. यात शाळकरी मुलींवर अत्याचार, छेड, पाठलाग करुन त्रास देण्याच्या तक्रारी वाढल्या. बदलापूर पाठोपाठ माजलगावात शाळेतील व्यक्तीने अत्याचार केल्याच्या घटनेने सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. त्यानंतर पोलिस विभागही सतर्क झाला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नुकतेच पोलिस ठाणे, वाहतूक पोलिसांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्वच ठाण्यांमधून अधिकारी, अंमलदारांनी शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. मुख्याध्यापक, शिक्षक, वाहनचालक, मालकांना सक्त सूचना केल्या.
सातारा परिसरातील १२२ शाळा, कॉलेजात उपक्रम
पोलिस उपायुक्त नवनीत काँवत, सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील यांनी शाळांच्या भेटी, चर्चाच्या नियमित उपक्रमासोबत सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगळ्या उपाययाेजना राबवण्याचे ठरवले. या परिसरात एकूण १२२ लहान मोठ्या शाळा, महाविद्यालय आहेत. प्रत्येक ठिकाणी स्कॅन कोड, तक्रार पेटी बसवल्या. त्यासोबत प्रमुख ५७ शाळा, महाविद्यालय एका अंमलदाराला दत्तक दिले. प्रत्येकी ८ ते १० शाळांची जबाबदारी एका सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकावर असेल, असे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी सांगितले.
अंमलदाराच्या प्रमुख जबाबदाऱ्या अशा :
- शाळा, महाविद्यालयातील अभिप्राय बुक रजिस्टर तपासणे.
- सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की नाही, याची तपासणी करावी.
- तक्रार पेटीत तक्रार येताच वरिष्ठांना कळवून चौकशी करावी.
- स्कॅन कोडच्या तक्रारी थेट पोलिस उपायुक्त कार्यालयाला पोहोचतील. तेथून संबंधित अंमलदार, अधिकाऱ्याला कळवले जाईल.