तुकडाबंदीला सर्वोच्च ब्रेक ! पळवाटेने होणाऱ्या दस्तनोंदणीला तूर्तास लगाम

By विकास राऊत | Published: August 3, 2023 12:25 PM2023-08-03T12:25:59+5:302023-08-03T12:27:14+5:30

तुकडाबंदी प्रकरणात शासनदेखील या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

For the time being, stoppage on illegal registration by supreme court | तुकडाबंदीला सर्वोच्च ब्रेक ! पळवाटेने होणाऱ्या दस्तनोंदणीला तूर्तास लगाम

तुकडाबंदीला सर्वोच्च ब्रेक ! पळवाटेने होणाऱ्या दस्तनोंदणीला तूर्तास लगाम

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलै २०२१ पासून तुकडाबंदी नियमाचे परिपत्रक काढल्यामुळे जिल्ह्यात एनए-४४ (अकृषी जमिनी / नॉन ॲग्रिकल्चर) वगळता, इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री २६ महिन्यांपासून बंद आहे. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांची स्थगिती दिल्यामुळे पळवाटेने होणाऱ्या दस्तनोंदणीला तूर्तास लगाम लागला आहे.

तुकडा बंदी परिपत्रकाविरोधात एका याचिकेवर सुनावणीअंती ५ मे २०२२ रोजी खंडपीठाने १२ जुलैचे परिपत्रक, नियम रद्द केले. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये खंडपीठाने शासनाची याचिका फेटाळली. त्यानंतर तुकडाबंदी अंतर्गत दस्तनोंदणीच्या व्यवहारांचा सपाटा सुरू होता. तुकडाबंदी प्रकरणात शासनदेखील या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

नगररचना प्राधिकरणाच्या धोरणात व्यवहार बसत नसले तरी मागील काही महिन्यांत तुकडाबंदीचे उल्लंघन करून अनेक व्यवहार झाले. या व्यवहारांमुळे ग्रीन झोनमध्ये अनधिकृत बांधकामे वाढल्याची शक्यता आहे. २६ महिन्यांपासून तुकडाबंदीमुळे गुंठेवारी वसाहतींसह शहरालगतच्या एन-ए नसलेल्या सर्व वसाहतींमधील प्लॉट व जुन्या बांधकामांचे व्यवहार ठप्प आहेत, तसेच ज्या सोसायट्यांमध्ये घर व प्लॉटचे व्यवहार करायचे आहेत, तेही थांबले आहेत. व्यवहार कसे सुरू होणार, याची विचारणा नागरिक मुद्रांक विभागाकडे करीत असतानाच आता दोन महिन्यांची स्थगिती आली आहे.

क्लिष्ट प्रक्रियेमुळे सामान्यांचे हाल...
एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर असेल, तर त्यातील एक, दोन किंवा तीन गुंठे जागा विकत घेता येत नाही, त्यांची रजिस्ट्री होत नाही. जमिनीचे अधिकृत ले-आउट करून घेतले, तरच रजिस्ट्री होत आहे. प्रमाणापेक्षा कमी क्षेत्र असेल, तर त्याच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. एखाद्या जागेच्या तुकड्याचा भूमिअभिलेख विभागाकडून स्वतंत्र मोजणीचा नकाशा असेल, तर त्याच्या विक्रीसाठी परवानगीची गरज नसेल. मात्र, त्याचे विभाजन करण्यासाठी तुकडाबंदीचे नियम लागू आहेत. अशा क्लिष्ट प्रक्रियेमुळे सामान्यांचे हाल होत आहेत.

दोन महिने स्थगिती....
सर्वोच्च न्यायालयाने तुकडाबंदीच्या व्यवहारांना दोन महिन्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात पळवाट काढून जे नोंदणी करीत होते. त्याला लगाम लागणार आहे. येत्या दोन महिन्यांत तुकडाबंदीचा एकही व्यवहार होणार नाही. जे नोंदणी करतील, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
-विवेक गांगुर्डे, जिल्हा मुद्रांक अधिकारी

Web Title: For the time being, stoppage on illegal registration by supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.