'अनेकदा बळजबरी केली, गर्भपातास भाग पाडले'; पत्नीने पतीविरोधात नोंदविला बलात्काराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 PM2021-05-21T16:23:56+5:302021-05-21T16:25:49+5:30
wife reported the crime of rape against the husband वेदांतनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, पिडिता आणि आरोपी व्यक्तीमध्ये २००७ पासून प्रेमसबंध होते.
औरंगाबाद: पत्नीवर बळजबरीकरुन वारंवार तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुध्द पीडित पत्नीने थेट पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदविली. आरोपी पतीने लग्नानंतर सासरी नांदवण्यास नेले नाही उलट खोली किरायने घेऊन त्याने तिच्यासोबत १४ वर्ष संसार केला आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याचे पिडितेने तक्रारीत नमूद केले.
वेदांतनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, पिडिता आणि आरोपी व्यक्तीमध्ये २००७ पासून प्रेमसबंध होते. यातून लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक सबंध ठेवले. यामुळे तिला अनेकदा गर्भधारणा झाली. गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून तो तिचा गर्भपात करायचा. यातच तिला पुन्हा दिवस गेल्यावर त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र पिडितेने त्याला नकार दिला. यामुळे शेवटी त्याने तिच्यासोबत नोंदणीकृत आंतरधर्मिय विवाह केला. तो तिला घेऊन स्वतःच्या घरी न जाता स्वतंत्र खोली किरायाने घेऊन राहात होता.
यादरम्यान, त्याने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला मात्र तिने नकार दिला. तिने एका मुलीला जन्म दिला. आम्हाला सासरी नांदवण्यास घेऊन जा असा तिचा आग्रह होता. मात्र, त्याने आईवडिलांच्या घरी पाऊल ठेवू दिले नाही. उलट मारहाण करून तिचा शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. त्रास असह्य झाल्यावर पिडितेने गुरुवारी वेदांतनगर ठाणे गाठून पतीविरुध्द बलात्कार करणे, बेकायदा गर्भपात करणे आणि छळाची तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शुभांगी लाटे तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.