बील भरायची सक्ती केली; संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 04:40 PM2021-11-17T16:40:28+5:302021-11-17T16:40:58+5:30
शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये बिल भरून नवीन रोहित्राची मागणी केली; परंतु महावितरणने सहा महिन्यांपासून हे रोहित्र दुरुस्त करून दिले नाही, तर नवीन रोहित्रदेखील बसविले नाही.
लासूर स्टेशन : सहा महिन्यांपासून रोहित्राची मागणी करूनदेखील महावितरण अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जात आहे. त्यात बिल भरण्याची सक्ती केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासूर स्टेशन येथील सहायक अभियंत्याला कार्यालयात कोंडले. अखेर शिल्लेगाव पोलिसांच्या मध्यस्थीने अभियंत्याची सुटका झाली.
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, अनंतपूर, वैरागड, बाभूळगाव शिवारातील रोहित्र सहा महिन्यांपुर्वी जळाले होते. शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये बिल भरून नवीन रोहित्राची मागणी केली; परंतु महावितरणने सहा महिन्यांपासून हे रोहित्र दुरुस्त करून दिले नाही, तर नवीन रोहित्रदेखील बसविले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून येथील महावितरण कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला गेला. मंगळवारी काही शेतकरी कार्यालयात विचारणा करण्यास गेले असता पुन्हा १२ हजार रुपये बिल भरा, नाहीतर रोहित्र नाही, असे सांगण्यात आले. त्यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सहायक अभियंता शिवाजी आहेर यांना धारेवर धरले.
सहा महिन्यांपासून रोहित्र तुमच्या ताब्यात आहे आणि आता सक्तीचे बिल भरण्यास का सांगता. असा प्रश्न उपस्थित करून आहेर यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडले. अखेर शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यस्थी करून शेतकऱ्यांना शांत होण्यास सांगितले. महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे यांना फोनवरून माहिती देऊन प्रश्न सोडविण्यास सांगितले. यावेळी उपसरपंच रवींद्र चव्हाण, भाजपायुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव, देवीदास ठोंबरे, भगवान गाडे, कारभारी जाधव, वाल्मीक वाकळे, प्रतीक देसले आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.