नाल्यात कचरा टाकल्यास फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:22 PM2018-07-11T22:22:11+5:302018-07-11T22:23:11+5:30
शहरात डेंग्यू व अन्य कीटकजन्य आजाराने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने फौजदारीचा इशारा दिला आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारीसोबतच दंडात्मक कारवाईचेही आदेश स्वास्थ्य निरीक्षकांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात डेंग्यू व अन्य कीटकजन्य आजाराने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने फौजदारीचा इशारा दिला आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारीसोबतच दंडात्मक कारवाईचेही आदेश स्वास्थ्य निरीक्षकांना दिले.
महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी साथीचे आजार, त्यावरील उपाययोजना व जनजागृतीबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांचेकडून माहिती जाणून घेतली. त्यात आरोग्य व स्वच्छता विभागाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. मनुष्यबळ व वाहने लावून नाल्यातील गाळ काढून घेण्यात आला आहे. अंबादेवी परिसरातील गाळ व कचरा जेसीबी व पोकलॅन्डद्वारे सफाई करून नाल्याचे पात्र वाढवण्यात आले. पिल्लरला अडकलेला कचरा वरचेवर काढण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळली आहे. शहर प्लास्टिकमुक्त करण्याकरिता ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व स्वास्थ्य निरीक्षक यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
कचरा उचलणे, झाडाच्या तुटलेल्या फांद्या, पालापाचोळा, गाळ त्वरित वाहून नेण्याच्या सूचना अधिनिस्थ यंत्रणेला दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मृत जनावरे २४ तासांत उचलण्याची कार्यवाहीसह मोठे नाले व नाल्यातून कचरा काढण्याची कारवाई निरंतर सुरु असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
कचऱ्यामुळे नाला ‘चोकअप’
काही नागरिक, दुकानदार नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा, पूजेचे साहित्य, हार, कपडे, बांधकामाचे मलमा, पालापाचोळा टाकत आहे. या कचऱ्यामुळे नाला परिसरात पाणी घुसण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. मागील वर्षी नमुना व मुधोळकर पेठ परिसरात नाल्याचे पाणी शिरुन मोठी वित्तहानी झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनीही नाल्यात कोणाला कचरा टाकू देऊ नये, स्वत:ही टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाल्यांमध्ये कचरा टाकू नये. कचरा डस्टबिनमध्ये जमा करून घंटीकटल्यातच टाकावा. कचरा इतरत्र फेकू नये. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे.
- संजय निपाणे,
आयुक्त, महापालिका