परदेशी पर्यटक अजिंठा लेणीपासून जाताहेत दूर; प्रवासातील गैरसोयी, असुविधांचा बसतोय फटका
By संतोष हिरेमठ | Published: March 6, 2024 03:12 PM2024-03-06T15:12:48+5:302024-03-06T15:13:49+5:30
वेरूळला जाणारे २५ टक्के पाहुणे करतात अजिंठा लेणी ‘स्किप’, कोण देणार लक्ष ?
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा आणि वेरूळ ही दोन जागतिक वारसा स्थळे आहेत. यापूर्वी परदेशी पर्यटकांना अजिंठा लेणीची सर्वाधिक भुरळ होती. मात्र, आता ट्रेंड बदलला असून परदेशी पर्यटक ‘अजिंठा’ ऐवजी वेरूळला प्राधान्य देत आहेत. वेरूळला जाणारे २५ टक्के परदेशी पाहुणे अजिंठा लेणीला जाणे टाळत आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीनंतर आता पर्यटनस्थळे पूर्वपदाकडे आली आहेत. परदेशी पर्यटकांची संख्याही पुन्हा एकदा वाढत आहे. वेरूळ-अजिंठा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असल्याने अनेक परदेशी-स्थानिक पर्यटक येतात. शहरात आल्यानंतर वेरूळ-अजिंठासह विविध स्थळांना भेटी देण्यास पर्यटक प्राधान्य देतात. मात्र, परदेशी पर्यटक वेरूळ लेणीला सर्वाधिक प्राधान्यक्रम देत आहेत. अजिंठा लेणीला भेट देण्याचे टाळले जात असल्याची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहायला मिळत आहे.
कारणांचा शोध, उपाय कोण करणार? इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे (आयटो) चारदिवसीय ३८ वे कन्व्हेन्शन (राष्ट्रीय अधिवेशन) २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ दरम्यान शहरात पार पडले. परिषदेनंतर टूर ऑपरेटर्सनी अजिंठा, वेरूळ लेणीसह पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा या रस्त्याची स्थिती चांगली नाही. अनेक वर्षांपासून काम सुरूच आहे. वाहतूक कोंडीचा त्रास होतो. याबरोबरच अनेक असुविधांवरून टूर ऑपरेटर्सनी नाराजी व्यक्त केली होती. ज्या बाबी, समस्या मांडण्यात आल्या आहे, त्या आगामी वर्षभरात शासनाने पूर्ण केल्या पाहिजे. यातूनच परदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सांगितले जाते.
अजिंठा लेणीला भेटणारे परदेशी पर्यटक
वर्ष- परदेशी पर्यटक
- २०२१ ते २२- ४०९ - २०२२ ते २३- ६,९६७
- एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३- ६,७८८
वेरूळ लेणीला भेटणारे परदेशी पर्यटक
वर्ष- परदेशी पर्यटक
- २०२१ ते २२- ६०५ - २०२२ ते २३- १०, ७४४ - एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३- ८,९३३
असुविधा, गैरसोयींचा परिणाम
अजिंठा लेणीला जाताना रस्त्याची ठिकठिकाणी स्थिती चांगली नाही. शहरातून अजिंठा लेणीपर्यंतच्या प्रवासादरम्यान कुठे थांबण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा नाही. लेणीत हाॅकर्सची समस्या आहे. पर्यटकांना वारंवार बूट काढावे लागतात. याठिकाणी शू-कव्हरचे मशीन बसविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ‘आयटो’च्या पदाधिकाऱ्यांनीही यासंदर्भात ऑक्टोबरमध्ये फीडबॅक दिला होता. मात्र, काहीही सुधारणा झालेली नाही, असे टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी सांगितले.