‘जी-२०’साठी औरंगाबादेत परदेशी पाहुणे येणार; दुरावस्थेने बसस्थानक झाकून ठेवायची वेळ
By संतोष हिरेमठ | Published: December 6, 2022 01:02 PM2022-12-06T13:02:48+5:302022-12-06T13:03:22+5:30
औरंगाबादवर अहमदाबाद सारखीच नामुष्कीची वेळ; जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी असलेल्या शहरातील बसस्थानकांची दुरवस्था
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : अहमदाबादेत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारी २०२० मधील दौऱ्यापूर्वी त्यांना झोपड्या दिसू नयेत, म्हणून एक खास भिंत उभारण्यात आली होती. फेब्रुवारीत होणाऱ्या जी-२० परिषदेनिमित्त अनेक देशांचे प्रतिनिधी औरंगाबादेत येणार आहेत. त्यांच्यासमोर शहराची नाचक्की होऊ नये, यासाठी अहमदाबादप्रमाणे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक झाकून ठेवायची वेळ येणार का, असाच प्रश्न आहे. कारण पर्यटन, उद्योगनगरीतील बसस्थानकांच्या दुरवस्थेकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याची चित्र आहे.
भारत, इटली व इंडोनेशिया हे तीन देश जी-२० परिषदेचे आयोजन करणार आहेत. त्याअंतर्गत १३ व १४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे ‘महिला व बाल विकास’ या विषयावर परिषद होणार आहे. त्यासाठी अनेक देशांतील प्रतिनिधी येणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक, तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेसोबतच वेरूळ, अजिंठा येथील सोयी-सुविधा, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक, पाणीपुरवठा आदी व्यवस्थांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. येणाऱ्या पाहुण्यांना सर्व सोयी-सुविधा देण्यात कोणतीही कमतरता भासणार नाही, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत; परंतु शहरातील बसस्थानकांच्या दुरवस्थेकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. शहरातील बसस्थानकांची दुरवस्था दोन महिन्यांत दूर होणार नाही. त्यामुळे परदेशी पाहुण्यांनी जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी असलेल्या शहरातील वाहतूक व्यवस्था पाहण्याचा विचार केला तर काय दाखविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे स्थिती?
मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. आजघडीला बसस्थानकातील प्लास्टर निखळल्याने जागोजागी छतातील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. इमारतीवर जागोजागी झाडी वाढली आहे. संपूर्ण आगार खडीमय, खड्डेमय झाले आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडते. सिडको बसस्थानकाच्या जागी होणाऱ्या बसपोर्टसह मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले; परंतु त्यानंतर ३ वर्षे होऊनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. सिडको बसस्थानकाच्या जागी विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक उभारण्याचे नियोजन कागदावरच आहे.
परवानगी मिळताच फेरनिविदा
सिडकोकडून लवकरच ‘एनओसी’ मिळणार आहे. त्यामुळे बसपोर्टचे काम लवकरच सुरू होईल. मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामासाठी डेव्हलपमेंट चार्ज न घेता परवानगी देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ही परवानगी मिळताच फेरनिविदा प्रक्रिया राबविली जाईल.
- गणेश राजगिरे, कार्यकारी अभियंता, एसटी महामंडळ.