काळविटाची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 02:44 PM2019-07-13T14:44:50+5:302019-07-13T14:46:13+5:30
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तरुणांनी दोन काळविटांची शिकार केली
वैजापूर (जि. औरंगाबाद) : काळविटाची शिकार करून मेजवानी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी वन विभागाने येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली.
तालुक्यातील हनुमंतगाव शिवारातील त्रिभुवन वस्ती येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तरुणांनी दोन काळविटांची शिकार करून मेजवानी ठरवली होती. या मेजवानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वीरगाव पोलिसांनी तातडीने या ठिकाणी छापा टाकून संजय बाबूराव त्रिभुवन, गुलाब बाळासाहेब फुलारे या दोघांना अटक केली होती, तर नानासाहेब सोपान परडे, सचिन अशोक त्रिभुवन, रवी एकनाथ त्रिभुवन हे तिघे पोलिसांना पाहून फरार झाले होते. दोन्ही आरोपींना पोलिसांनी वन विभागाच्या स्वाधीन केले. एका काळविटाचे मांस, कातडी, शिंगे व हत्यारे वन विभागाने जप्त केली आहेत. सर्व आरोपी हे हनुमंतगावचे रहिवासी आहेत. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला.