छत्रपती संभाजीनगरात वनविभाग आणि बिबट्याचा लपंडाव सुरूच
By साहेबराव हिवराळे | Published: July 20, 2024 07:08 PM2024-07-20T19:08:35+5:302024-07-20T19:09:06+5:30
पिंजऱ्यांना बिबट्याची हुलकावणी, एरव्ही विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंडे बंद
छत्रपती संभाजीनगर : वनविभागाने उल्कानगरी, शंभूनगर, प्रोझोन मॉल व एस.टी. वर्कशॉप आणि स्मशानभूमीसह ५ पिंजरे लावले. पण, बिबट हुलकावणी देत असल्याने वनविभाग आणि रेस्क्यू टीमचीही सोमवारपासून धावपळ सुरू आहे. प्रोझोन मॉल परिसरातून बिबट्याचे अखेरचे फुटेज बुधवारी पहाटे ४.१९ वा. एन-१ सिडको परिसरातील आहे. त्यामुळे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.
बिबट्याच्या भटकंतीत कुत्रे आणि डुकरांचा फडशा पाडलेले चित्रीकरणही वनविभाग तसेच नागरिकांना मिळाले आहे. शंभूनगर पोद्दार शाळेच्या मागे लावलेल्या बिबट्याचे फोटो देखील नागरिकांनी पाहिले असून, पिंजऱ्यात आमिष म्हणून कोंडलेल्या बकऱ्यांची मात्र ‘म्याऽऽ म्याऽऽ’ अशी ओरड सुरूच आहे. लाईनमन दत्ता ढगे यांना सर्वप्रथम बिबट दिसला. आधी वनविभाग हे मान्य करत नव्हता. अखेर फुटेज दिसले. मग वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला आणि मंगळवारी जुन्नरचे रेस्क्यू पथक बोलावून दोन पिंजरे लावले. शहर परिसरात १६ वेगवेगळ्या टीम लक्ष ठेवून आहेत.
अनेक फेक व्हिडीओ व फोटो व्हायरल...
बीड बायपास, रेल्वे स्टेशन, काबरानगर, एन-८, देवळाई, उल्कानगरी गोशाळा, एन-१ सिडको इ. भागांच्या नावावर खोटे व चुकीचे व्हिडीओ टाकले जात आहेत. एन-१ सिडको परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आली.
कॅमेऱ्यांचीही पिंजऱ्यावर नजर...
ज्या ठिकाणी पिंजरे लावले, त्यास ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी. ७, वनपाल व वनरक्षक ५५ आणि इको, बटालियनचे ६, रेस्क्यू टीम, जुन्नरचे ३, असे एकूण ७१, अधिकारी व कर्मचारी गस्तीवर आहेत. गस्तीसाठी त्यांच्या १६ टीम तयार करण्यात आलेल्या आहेत.
- सूर्यकांत मंकावार, उपवनसंरक्षक, प्रादेशिक वनविभाग
जनतेला भयभीत करू नका...
कोणतीही माहिती नसताना चुकीचे व्हिडीओ पाठवून नागरिकांना भयभीत करण्याचा प्रकार थांबवा. अद्याप काहीही अनुचित घडलेले नाही. फक्त सत्य फोटो व व्हिडीओ टाकल्यास मदत होईल. वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे.
- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य
कुत्रे भुंकेना, अगदी चिडीचूप !
-कोणास ठाऊक दोन दिवसांपासून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत नाही. एन- १ परिसरात शांतता आहे.
-तुकाराम जानराव, सुरक्षारक्षक
वर्दळ कमी झाली
रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाली असून, वनविभाग पथकाच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
-सुनील घोरपडे, सुरक्षारक्षक