भाजीमार्केट व व्यापारी संकुलाचा मनपाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 07:19 PM2018-12-22T19:19:32+5:302018-12-22T19:19:40+5:30
सातारा- देवळाईत पाऊण लाखापेक्षा अधिक लोकवस्तीत भाजी मार्केट, व्यापारी संकुलाचा महापालिका प्रशसनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.
सातारा- देवळाई : पाऊण लाखावरील लोकवस्तीमध्ये सुविधांचा अभाव
औरंगाबाद : सातारा- देवळाईत पाऊण लाखापेक्षा अधिक लोकवस्तीत भाजी मार्केट, व्यापारी संकुलाचा महापालिका प्रशसनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.
गुलमंडी क्षेत्राला मनपाने आकारलेला कर सातारा- देवळाईकरांकडून वसूल केला जातो. मग त्या तुलनेत सेवासुविधा देण्यावर मात्र अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा भर नाही. वसुली मोहीम राबवून वसुलीचा तगादा लावला जातो. नवीन मालमत्तेला देखील कर लावण्यात येत आहे. कर वसुलीसाठी अधिकारी जेवढी मेहनत घेतात, तेवढी सुविधा पुरविण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मनपाकडे कोट्यवधींचा निधी असतानाही त्यावर राजकीय श्रेय घेण्यात पदाधिकारी गुंतले असून, सातारा- देवळाईच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप रहिवाशांतून केला जात आहे.
विस्तीर्ण परिसर आणि गैरसोय
परिसराचा मनपात समावेश होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला असून, पदाधिकाºयांनी देखील व्यापारी संकुल वा भाजी मार्केटचा ठराव मनपात मांडलेला नाही. कार्यालयातून घरी येताना पालेभाजी व इतर साहित्य खरेदी करून यावे लागते. घर बांधताना परिसर मोकळा असून, प्रदुषण नाही, मनपात गेल्यानंतर लवकरच सुधारणा होईल असे प्रत्येकाला वाटले परंतु भ्रमनिरस झाला आहे.
भूखंडाचा उपयोग करा
सातारा- देवळाई दोन्ही ग्रामपंचायतीच्या काळात खेळाचे मैदान व उद्यान असे ४६ भुखंडाची नोंद आहे. परंतु बहुतांश भूखंड रिवाईज करून त्याची विक्री झाली आहे. त्याकडे मनपा का लक्ष देत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला जात आहे. परिसरातील ड्रेनेज, रस्ते, लाईट इत्यादी प्रमुख प्रश्नांवर तोडगा काढण्यासही अति संथगतीने काम केले जात आहे. तेव्हा मोकळ्या भुखंडावर व्यापारी संकुल तसेच भाजीमंडई सुरू केल्यास नागरिकांची गैरसोय टळणार आहे, असे रोहण पवार, माजी उपसरपंच राजू नरवडे यांचे म्हणणे आहे.
बेरोजगारांना रोजगार मिळेल
शहरात विविध ठिकाणी व्यवसायिक दृष्टिकोनातून व्यापारी संकुल तसेच भाजी मार्केट काढून जनतेला सेवा पुरविण्याचे काम मनपाने केले आहे. परंतु सातारा- देवळाईत मनपाने स्वत:चा ठसा उमटविणारे एकही काम केलेले नाही. बेरोजगारांना व्यवसाय मिळेल अन् नागरिकांना सेवा मिळेल,असे माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल, नामदेव बाजड म्हणाले.