"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:25 AM2019-01-24T04:25:56+5:302019-01-24T04:26:06+5:30
कोणत्याही देशात हुकूमशाही येण्याअगोदर मजबूत संस्था उद्ध्वस्त केल्या जातात.
औरंगाबाद : कोणत्याही देशात हुकूमशाही येण्याअगोदर मजबूत संस्था उद्ध्वस्त केल्या जातात. हीच प्रक्रिया देशात सुरू आहे. या विरोधात समविचारी लोकांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी युवकांना केले.
युथ फॉर डेमोक्रॅसी आणि निर्धार सोशल फाऊंडेशनतर्फे ‘सोच से सोच की लढाई’ हा संवादात्मक कार्यक्रम बुधवारी (दि.२३) तिरुमला मंगल कार्यालय, गारखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरू, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, पत्रकार अमेय तिरोडकर, उद्योजक तथा लेखक शरद तांदळे आणि राष्ट्रीय समन्वयक मनीष शर्मा यांची उपस्थिती होती.
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मागील साडेचार वर्षांत मोदी-शहा जोडीने सीबीआय, आरबीआय, न्यायव्यवस्था, यूजीसी, केंद्रीय विद्यापीठे, बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. लोकशाहीच्या स्तंभांवर नियंत्रण मिळवले आहे. हुकूमशाही येण्याची हीच लक्षणे आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना हाताशी धरून राफेल घोटाळा दाबण्यात येत आहे. हा न्यायालयाचा अवमान वाटत असेल, पण दिलेल्या निर्णयाचे अवलोकन करणे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संघ विचाराचे लोक भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद ताब्यात घेत ५ हजार वर्षांचा इतिहास बदलण्याचा अजेंडा राबवीत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधी हत्येनंतर संघावर बंदी घातलेली मूळ अभिलेखे गायब केली आहेत. उलट त्याच पटेल यांना स्वत:चा बाप बनवून घेत असल्याची टीकाही डॉ. आव्हाड यांनी केली.