अक्षम्य दुर्लक्ष ! कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आरोग्य यंत्रणेला पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 02:00 PM2021-03-31T14:00:46+5:302021-03-31T14:05:22+5:30
No contact tracing in Aurangabad : एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करावी, असे निकष ठरविण्यात आले.
औरंगाबाद : वर्षभरापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाइकांना, शेजारी, वसाहतीमधील नागरिकांना नेऊन कोरोनाची तपासणी करण्यात येत होती. आता तर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा महापालिकेकडून तपासणी होत नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार पूर्वीही होता आणि आजही कायम आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे या प्रकाराकडे गंभीर दुर्लक्ष होत आहे. कोरोना संसर्ग वाढण्यास यामुळे मदत होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्षभरापूर्वी बाधित रुग्णांच्या घराजवळ महापालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. कोरोना आजारामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा नवीन प्रकार नागरिकांना कळाला. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करावी, असे निकष ठरविण्यात आले. हे निकष आजही जशास तसे आहेत. मात्र, औरंगाबाद महापालिकेला याचा विसर पडला आहे. मागील काही दिवसांपासून महापालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा प्रकार जवळपास बंदच करून टाकला आहे. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य घाबरून स्वतःहून तपासणी करून घेत आहेत. अनेकजण तपासणीच करीत नाहीत. बाधित आलेल्या प्रत्येक रुग्णाचा नंबर, पत्ता महापालिकेकडे असतो. मात्र, त्यांना तपासणीसाठी महापालिकेकडून सांगण्यात येत नाही. कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाबाधित असू शकतात. त्यांना शोधून काढण्याचे काम महापालिकेकडून होत नाही.
मनपाकडून विचारणाही नाही
सिडको एन-८ भागातील ३८ वर्षीय तरुण बाधित आला. त्याच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य नंतर बाधित आला. दोन्ही रुग्णांची संपूर्ण माहिती महापालिकेकडे होती. मात्र, मागील आठ दिवसांमध्ये महापालिकेने संबंधित रुग्णांना विचारलासुद्धा केलेली नाही. कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी झाली किंवा नाही हेसुद्धा विचारले नाही.
५ जणांचीही तपासणी नाही
एका बाधित रुग्णाच्या कुटुंबातील किमान पाच सदस्यांची तरी महापालिकेने दररोज तपासणी केली तर १५०० रुग्णांच्या संपर्कातील ७५०० जणांची तपासणी करावी लागेल. संपूर्ण शहरात दररोज तीन ते चार हजार जणांची तपासणी होत आहे. या सर्व तपासण्या नागरिक रांगा लावून करीत आहेत, हे विशेष.
रुग्णवाढीमुळे थोडेसे दुर्लक्ष
एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान तीन जणांची तरी तपासणी करण्याकडे महापालिकेचा कल आहे. तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दररोज दहा हजार नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणि आसपासच्या नागरिकांची तपासणी करण्यात येईल.
- डॉ. बाळकृष्ण राठोडकर, प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.