ई- पीक नोंदणी विसरली? मग सरकारी मदत विसरा, शेवटचे ९ दिवस शिल्लक
By बापू सोळुंके | Published: October 6, 2023 12:44 PM2023-10-06T12:44:31+5:302023-10-06T12:45:01+5:30
ई- पीक पाहणी मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अथवा तलाठी स्तरावर शेतकरी पीकपेऱ्याची नाेंदणी करू शकतात.
छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी खरीप हंगामात पेरलेल्या पिकाची ई- पीक नोंदणी करणे गरजेचे आहे. यावर्षी आजपर्यंत केवळ ६६ टक्के शेतकऱ्यांनीच ई- पीक पेरा नाेंदणी केली आहे. १५ ऑक्टोबर ही ई- पीक पाहणी नोंदणीची शेवटची तारीख आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी पीक पेऱ्याची नोंद तातडीने करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात ८ लाख ३० हजार १७ शेेतकरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ लाख ३० हजार १७ शेतकऱ्यांकडे जमीन असल्याची नोंद आहे. शेतकरी स्वत: मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांनी खरीप हंगामात पेरलेल्या पिकाची नोंदणी ऑनलाइन करू शकतात. याशिवाय तलाठी स्तरावरही पीक पाहणीची नोंद करता येते.
१५ ऑक्टोबरपर्यंतच मुदत
खरीप हंगामातील पीक पेऱ्याची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना १५ ऑक्टोबर ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. ई-पीक नोंदणी करणे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. याबाबतची नाेंद सातबाऱ्यावर होत असते.
न केलेल्यांचे पुढे काय?
ई- पीक पाहणी मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अथवा तलाठी स्तरावर शेतकरी पीकपेऱ्याची नाेंदणी करू शकतात. असे असले तरी जे शेतकरी ही नोंदणी करणार नाहीत, त्यांना अतिवृष्टी, दुष्काळी परिस्थितीमुळे पीकनिहाय नुकसानभरपाई शासनाकडून देण्यात येते. या भरपाईपासून शेतकरी वंचित राहू शकतात. विमा उतरविलेला असेल तरी ई- पीक पाहणीची नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास नकार देऊ शकते.
ई- केवायसी बंधनकारक
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई- पीक पेरा नोंद करणे शासनाने बंधनकारक केले आहे. मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही नोंदणी करता येते. काही भागांत मोबाइल रेंज नसते, अशा वेळी ऑफलाइन छायाचित्रे ते अपलोड करू शकतात. ई- केवायसी नसेल तर शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहू शकतात. यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी करावी.
- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर.
कोणत्या तालुक्यात किती शेतकऱ्यांची नोंदणी?
तालुका ---- ई- पीक पेरा नोंदणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
छत्रपती संभाजीनगर---२४९३५
कन्नड----७२८६३
खुलताबाद--- २२२८६
सिल्लोड------६१८९५
साेयगाव---२६६७८
वैजापूर----८६९८२
गंगापूर---६२०७९
पैठण----४६१८४
फुलंबी---२८६०९