विद्यापीठाला पडला व्याख्यात्यांच्या मानधनाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 05:42 PM2018-05-26T17:42:11+5:302018-05-26T17:53:16+5:30
व्याख्यात्याला तीन महिने उलटले तरी मानधन आणि प्रवासभत्ता देण्यात आला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बोलावण्यात आलेल्या व्याख्यात्याला तीन महिने उलटले तरी मानधन आणि प्रवासभत्ता देण्यात आला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण यांनी १९ मे रोजी पदाचा राजीनामा दिला आहे.
विद्यापीठात यावर्षी शिवजयंती उत्साहात साजरी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातर्फे विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आठ दिवस आयोजन केले होते. तर १९ फेब्रुवारीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण संचालक विभागाने केले होते. यावेळी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक विजय चोरमारे यांचे विशेष व्याख्यान ठेवण्यात आले.
विद्यार्थी कल्याण विभागाने अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. चव्हाण यांना मुख्य कार्यक्रमाच्या व्याख्यानासाठी पाहुणा सुचविण्यास सांगितले होते. त्यानुसार विजय चोरमारे यांच्या नावाची शिफारस त्यांनी केली. व्याख्यान संपल्यानंतर पाहुणे निघताना मानधन देण्याची पद्धत आहे. मात्र चोरमारे यांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात आला नाही. ते विनामानधनच परतले.
डॉ. चव्हाण यांनी बोलावलेल्या पाहुण्याला नियमानुसार मानधन आणि प्रवासभत्ता देण्यासाठी विद्यार्थी कल्याण संचालक विभागाला अनेक वेळा विनंती केली. मात्र या विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. कार्यक्रमाला तीन महिने उलटले तरी विद्यार्थी कल्याण संचालक आणि वित्त व लेखाधिकारी विभागाच्या गोंधळात व्याख्यात्याचे मानधन देण्यात येत नाही. यात विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची बदनामी होत असल्यामुळे डॉ. राम चव्हाण यांनी शनिवारी (दि.१९ मे) संचालकपदाचा राजीनामा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. डॉ. राम चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
तीन महिने पाच दिवसांनी मिळाले मानधन
शिवजयंतीच्या व्याख्यानाला बोलावलेल्या व्याख्यात्याला मानधन व प्रवासभत्ता देण्यात येत नसल्यामुळे अध्यासन केंद्राच्या संचालकांनी शनिवारी राजीनामा दिला. यामुळे खडबडून जागे झालेल्या लेखा विभागाने व्याख्यात्याचे मानधन संबंधितांच्या बँक खात्यात गुरुवारी (दि.२४) अदा केले असल्याची माहिती लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तब्बल तीन महिने पाच दिवसांनी मानधन मिळाले आहे.