श्रोत्यांनी कवितेतून अनुभवले पावसाचे रूप
By Admin | Published: June 29, 2014 12:42 AM2014-06-29T00:42:49+5:302014-06-29T01:00:26+5:30
औरंगाबाद : नको, नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा’ अशा पावसाच्या काव्यमय सुखद सरींचा अनुभव श्रोते घेत असतानाच दडी दिलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दाहकताही व्यक्त झाली
औरंगाबाद : ‘वर्षाने आले पावसाचे दिस, मातीला फुटले हिरवे पीस... सृष्टीने घेतला श्रावण श्वास...’, ‘नको, नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा’, ‘नको नको रे पावसा असा अवेळी रुसवा...’ अशा पावसाच्या काव्यमय सुखद सरींचा अनुभव श्रोते घेत असतानाच दडी दिलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दाहकताही व्यक्त झाली.
प्रसंग होता आयएमए हॉल येथे आयोजित पाऊस कवितांच्या अभिवाचनाचा. पहिल्या पावसात भिजण्यासाठी आतुर असलेली मंडळी कवितांच्या पावसात भिजण्यासाठी हजर होती. मात्र, अनेकांच्या चेहऱ्यावर ताण दिलेल्या पावसाची कधी एकदा ‘बरसात’ होते असेच भाव होते. आज रसिकांनी काव्याच्या पावसात मनसोक्त भिजून साहित्यातील पाऊस अनुभवला. पावसाचे रुसणे, फुगणे, पावसाच्या सरी, जोरदार, वादळी वाऱ्यासह मुसळधार, ढगफुटी अशी पावसाची विविध रूपे आज काव्याच्या रूपातून सादर झाली. हॉलमध्ये प्रवेश करताच बालकवींच्या ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ या काव्याच्या प्रती व निशिगंधांचे फूल देऊन आयोजकांनी प्रत्येकाचे मनपासून स्वागत केले. ‘एकदा एक पाऊस शाळेत गेला’ ही विजय शेंडगे यांची रचना सहा वर्षांच्या रेवा जोशी या चिमुकलीने सादर करून सर्वांना लहानपणीच्या आठवणीत नेऊन ठेवले. ‘समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना’ या सुधीर मोघे यांनी गायलेल्या लयबद्ध गीताला रसिकांनी टाळ्यांची साथ दिली. ‘तुझे रिमझिमणे, तुझे गडगडणे बोलवते रे मला... माझ्यासाठी घेऊन येतोस इंद्रधनूचा झुला...’ अशा काव्यात श्रोतेही चिंब भिजून त्याचा मनमुराद आनंद लुटत होते. ‘सुनसान रस्त्यावर उगाच एकटा कोसळत नको राहू, नाही तर लोक म्हणतील वेडा झाला पाऊस...’ या काव्यातून साऱ्यांनी पावसाचे लहरी रूप अनुभवले. ‘पाऊस हसवितो, नाचवितो अन् उद्ध्वस्त करतो’ ही कविताही साऱ्यांना चटका लावून गेली. ‘हातात गुंफून हात तुझ्या चालत होतो तेव्हा... पाऊस फुलांचा होता’ ही मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली प्रेमकविता साऱ्यांना सुखवून गेली. नामांकित कवींच्या पावसावरील कविता सीमा मोघे, गीता देशपांडे, अश्विनी दाशरथे, वृषाली देशपांडे, सौरभ सदावर्ते व हर्षवर्धन दीक्षित यांनी तेवढ्याच तल्लीनतेने सादर केली. कविता सादर होतानाच डॉ. जे.पी. वैद्य यांनी पावसाचे चित्र साकारून वेगळीच अनुभूती दिली.
पाऊस येणार जोरदार येणार...
पावसाच्या कवितेचे राष्ट्रगीत असा उल्लेख करीत बालकवींची ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही कविता रसिकांनी सामूहिकरीत्या गाऊन पावसाला जणू सादच घातली. आता जरी पावसाने दडी मारली तरी हवालदिल होऊ नका. कारण, ‘पाऊस येणार जोरदार बरसणार’अशी सकारात्मक ऊर्जा या कार्यक्रमाने सर्वांना दिली.