नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ; विधिवत पूजनानंतर रांजण भरण्याची प्रक्रिया सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 06:21 PM2020-03-11T18:21:10+5:302020-03-11T18:26:39+5:30
ज्या दिवशी भरतो त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात अशी शेकडो वर्षापासून वारकऱ्यांची धारणा आहे.
- संजय जाधव
पैठण :
आवडीने कावडीने वाहीले पाणी।
एकचि काय वदावे पडिल्या कार्यात वाहिले पाणी।।
नाथमहाराजांच्या वाड्यातील ( गावातील नाथमंदीर) ज्या रांजणात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांनी गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका आहे, अशा पवित्र रांजणाची विधीवत पूजा करुन त्यात पाणी भरण्यास सुरवात झाली. रांजण भरण्यास सुरवात होताच नाथषष्ठीस औपचारिक प्रारंभ होतो. भाविक गोदावरीतून पाणी आणून या रांजणात ओततात हा रांजण ज्या दिवशी भरतो त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात अशी शेकडो वर्षापासून वारकऱ्यांची धारणा आहे. यंदा किती दिवसांनी रांजण भरेल याकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे.
तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर नाथवंशजांनी या पवित्र रांजणाची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला. भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात पैठण नगरीत वास्तव्य करून सलग १२ वर्ष नाथ महाराजांच्या वाड्यातील या पवित्र रांजणात गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका आहे. रांजण भरण्यास प्रारंभ झाला म्हणजे नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिकपणे प्रारंभ झाला असे मानले जाते.
अशी आहे आख्यायिका
जगाच्या पाठीवर श्रीसंत एकनाथ महाराज असे संत होते की, भगवान श्रीकृष्णांना देखील नाथ महाराजांच्या घरी राहून सेवा करण्याची ऊत्कट ईच्छा निर्माण झाली. भगवंत 'श्रीखंड्या' हे रूप धारण करून नाथांच्या घरी प्रकट झाले. नाथ महाराजांची भेट घेऊन त्यांनी सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला, सांगाल ते पडेल ते काम करीन मला सेवा करू द्या अशी विनंती करून नाथ महाराजांची परवानगी मिळविली. नाथ महाराजांच्या घरी राहून भगवंत सर्व कामे करू लागले, सडा ,भांडी, स्वयंपाक, ऊष्टावळी, गंध ऊगळणे, स्नानाचे पाणी काढून देणे , गिरिजा आईस स्वयंपाकास मदत करणे, नाथ महाराज किर्तन करत असताना धृपद म्हणणे, किर्तनात नाचणे असे नानाविध कामे करत भगवंत नाथ महाराजां सोबत सावली सारखे वावरत होते. भगवंताचे पैठण नगरीत पाणी भरण्याचे कार्य सुरू असताना द्वारकेत एका भक्ताने श्रीकृष्ण दर्शनासाठी खडतर तपश्चर्या सुरू केली होती, अखेर या भक्तास दृष्टांत झाला की, भगवान श्रीकृष्ण हे नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात आहेत, त्या भक्ताने पैठणला येऊन नाथ महाराजांना या बाबत कल्पना दिली हे समजताच प्रत्यक्ष भगवंताकडून सेवा करून घेतली याचे नाथ महाराजांना फार वाईट वाटले. लगेच श्रीखंड्याच्या रूपातील भगवंताचा पैठण नगरित शोध सूरू झाला परंतु भगवंत कोठेच सापडेना शेवटी नाथ महाराजांनी भगवंताचा धावा करताना माझ्या हातून काय अपराध घडला म्हणून भगवंत आपण माझ्यावर रागावलात अशा शब्दात भगवंताची विनवणी केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले. नाथ महाराज व द्वारकेच्या भक्तास भगवंतानी दर्शन दिले. नाथ महाराजांनी आपण पैठण सोडून जाऊ नये अशी विनंती भगवंतांना केली, तेव्हा मी दरवर्षी येथे येईल असे सांगत भगवान श्रीकृष्णांनी पैठण नगरीतून प्रस्थान केले.
रांजण भरण्यास भगवंत येतात
भगवंताने मी दरवर्षी पैठण येथे येईल असे सांगितले होते तेव्हा पासून नाथषष्ठी सोहळ्यास भगवान श्रीकृष्ण कुणाच्याही रूपात उपस्थित राहतात असे मानले जाते, ज्याच्या हातून पवित्र रांजण भरला जातो त्यास भगवान श्रीकृष्ण माणून नाथवंशजांच्या वतीने मान देण्यात येतो. संत एकनाथ षष्ठी उत्सवास आज तुकाराम बीज पासून रांजनाच्या पुजेने प्रारंभ झाला. रघुनाथ महाराज पांडव ( पालखीवाले) यांच्या हस्ते विधीवत मंत्रघोषात पूजा करण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष सुरज लोळगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, आदी मान्यवरासह मोठ्यासंख्येने भाविक भक्त नाथमंदिरात उपस्थित होते.