भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणींचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:37 AM2020-02-18T11:37:00+5:302020-02-18T11:45:14+5:30
किशनचंद तनवाणी मुंबईत उद्धव ठाकरेंना भेटणार
औरंगाबाद : मूळचे शिवसेनेचे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष असलेले किशनचंद तनवाणी हे भाजपला राम राम ठोकून शिवबंधन बांधणार हे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती आहे.
भाजपचे शहराध्यक्ष म्हणून पक्षाने त्यांना दिलेले वाहन त्यांनी सोमवारी दुपारी परत केल्याने तसेच आ. संजय शिरसाट यांनी त्यांची लागलीच भेट घेतल्याने ते लवकरच शिवसेनेत दाखल होतील, असे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. मात्र असे असले तरी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर आणि आ. अतुल सावे यांनी तनवाणी कोठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तनवाणी हे भाजप सोडून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षाने शहराध्यक्षपदी त्यांच्याऐवजी संजय केणेकर यांची नियुक्ती केल्याने ते पक्षावर नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचाही केणेकर यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. सोमवारी सकाळपासूनच तनवाणी पक्ष सोडून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ते पक्षात यावे यासाठी त्यांचे मित्र आ. संजय शिरसाट हेदेखील गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. तनवाणी यांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पक्षाने त्यांना शहराध्यक्ष म्हणून दिलेली गाडी परत केली. ती त्यांनी भाजपच्या उस्मानपुरा कार्यालयासमोर उभी केली. तनवाणी यांनी वाहन परत केल्याचे कळताच आ. अतुल सावे हे तनवाणी यांच्या निवासस्थानी धावले. आ. सावे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आ. शिरसाट हे तनवाणी यांच्या घरी गेले. तेथे सुमारे अर्धा तास त्यांनी तनवाणी यांच्यासोबत चर्चा केली. तनवाणी यांनी भाजपचे वाहन परत केल्याची वार्ता लागलीच शहरात पसरली आणि ते स्वगृही परततील अशी चर्चा सुरू झाली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेनेचे असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचे धोरण शिवसेनेने अवलंबिले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी महापौर गजानन बारवाल यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यापूर्वीपासून तनवाणी हे स्वगृही परतण्यास उत्सुक असल्याचे वातावरण शिवसेनेतर्फे निर्माण करण्यात आले आहे. तनवाणी यांच्यासोबत भाजपचे किमान तीन ते चार विद्यमान नगरसेवक आणि काही माजी नगरसेवक तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे. तनवाणी यांनीही आपला प्रवेश हा किरकोळ प्रवेश न ठरता तो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तनवाणी कुठेही जाणार नाहीत
भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे कुठेही जाणार नाहीत. ते पक्षासोबत राहणार आहेत, असा दावा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी केला. पक्षाने शहराध्यक्षांना संघटन बांधणीसाठी दिलेले वाहन कार्यकाळ संपल्यानंतर पक्ष कार्यालयाकडे जमा करावे लागते. त्यानुसार तनवाणी यांनी त्यांच्याकडील चारचाकी वाहन विभागीय कार्यालयाकडे जमा केले आहे. वाहन जमा केले, याचा अर्थ ते पक्षातून जाणार आहेत, असा होत नाही.
- संजय केणेकर, शहराध्यक्ष, भाजप
सदिच्छा भेट होती
मी तनवाणी यांना नेहमीच भेटतो. आजही त्यांची त्या पद्धतीनेच भेट घेतली. त्यांची मनधरणी करण्यासाठी मी गेलो नव्हतो. तर ही एक नेहमीसारखी भेट होती.
- अतुल सावे, आमदार, भाजप
ते निर्णय घेण्यास सक्षम
मी आज त्यांची भेट घेतली असली तरी त्यांच्या प्रवेशासंदर्भातील विषय चर्चेला नव्हता. ते नाराज आहेत किंवा काय हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. ते कोणताही निर्णय घेण्यास सक्षम आहेत.
- संजय शिरसाट, आमदार, शिवसेना
पक्षाचे वाहन आज परत केले
भाजप शहराध्यक्षपदावर असताना माझ्याकडे एक चारचाकी वाहन होते. शहराध्यक्षपद नसल्यामुळे मी आज वाहन परत पक्षाच्या कार्यालयात जमा केले. वाहन परत करणे म्हणजे पक्ष सोडणे असा अर्थ होत नाही. ज्याला त्याला वाटेल त्या पद्धतीने अर्थ काढत असेल तर मी काय करणार आहे. मी अद्यापपर्यंत भाजपमध्येच आहे.
-किशनचंद तनवाणी, माजी शहराध्यक्ष, भाजप