फसवणुक प्रकरणात दीड वर्षांनंतर माजी उपजिल्हाधिकारी गावंडेंची पोलिसांत हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 04:01 PM2020-12-21T16:01:47+5:302020-12-21T16:03:21+5:30
महागड्या वस्तू कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून दीड वर्षांपूर्वी अनेकांना अनेकांना गंडा
औरंगाबाद : बचत गटात गुंतवणूक केल्यास महागड्या वस्तू कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून दीड वर्षांपूर्वी अनेकांना अनेकांना गंडा घातला. या प्रकरणातील सहआरोपी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी पहिल्यांदाच आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली.
अंगणवाडीसेविका संगीता दीपक कस्तुरे (वय ३०, रा. बायजीपुरा) यांनी पुंडलिकनगर ठाण्यात दीड वर्षांपूर्वी फिर्याद दिली होती की, ८ मे २०१९ रोजी महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी कस्तुरे यांच्या नणंद सरिता उमेश बाबरेकर (रा. पुंडलिकनगर) यांच्याकडे गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांची सुरेखा मनाजी म्हेत्रे (रा. पुंडलिकनगर) हिच्याशी भेट झाली होती. तेव्हा म्हेत्रेने त्यांना परभणीतील सावित्रीबाई फुले महिला बचत गटातर्फे घरगुती वापराच्या महागड्या वस्तू बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकत दिले जातात. तसेच हा बचत गट सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांचा आहे. मात्र, ते शासकीय नोकरीत असल्याने आपल्या नावावर हा व्यवसाय पुढे नेत आहे, असे सुरेखा म्हेत्रे यांनी सांगितले होते.
सेवानिवृत्त झाल्यानंतर गावंडे हे पुंडलिकनगर येथे सुरेखा म्हेत्रे यांच्या घरी यायचे. तेव्हा ते आमिषाला बळी पडलेल्या अनेकांना ‘तुमची फसवणूक होणार नाही. तुमचा फायदाच होईल’, असा धीर द्यायचे. तेव्हा अनेक नागरिकांनी म्हेत्रे यांच्याकडे धनादेश, ‘आरटीजीएस’द्वारे मोठ्या रकमा जमा केल्या. काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी गावंडे यांना संपर्क केला. तेव्हा १९ ऑगस्ट रोजी सुरेखा म्हेत्रेला सोबत घेऊन गावंडे हे करमाड परिसरात एका हॉटेलवर आले. आठ दिवसांत सर्वांचे पैसे परत देण्याचे आश्वासन देऊन ते तेथून निघून गेले. अखेर नागरिकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. प्राप्त तक्रारीवरुन, पोलिसांनी या गुन्ह्यात सुरेखा म्हेत्रे हिस मुख्य आरोपी तर विश्वंभर गावंडे यांना सहआरोपी केले आहे.
खंडपीठात अटकपूर्व जामीन
यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब सिंगारे यांनी सांगितले की, गावंडे यांना औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर फसवणुकीच्या या गुन्ह्यात ते खरेच सहआरोपी आहेत का, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या कामात पोलिसांना गावंडे यांनी सहकार्य करावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ते रविवारी आर्थिक गुन्हेशाखेत आले. आम्ही चौकशी करीत आहोत.