आधीचे दुष्काळग्रस्त का-होळ आता ‘पाणीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:46 AM2017-12-26T00:46:22+5:302017-12-26T00:46:43+5:30

जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे.

 The former drought-stricken is now 'watery' | आधीचे दुष्काळग्रस्त का-होळ आता ‘पाणीदार’

आधीचे दुष्काळग्रस्त का-होळ आता ‘पाणीदार’

googlenewsNext

रत्नाकर तांबट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दुधड : जवळपास तीन वर्षांपूर्वी आजूबाजूच्या गावांतील विहिरी, तलावातून पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी विनंत्या, अर्ज करणा-या का-होळ (ता. औरंगाबाद) गावाचा जलसंधारणाच्या कामांमुळे अक्षरश: कायापालट झाला आहे. गावाच्या आजूबाजूला झालेले सिमेंट बंधारे, मातीनाला बांधांमुळे दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख मिटली आहे. सध्या इतर गावांनाही पाणीपुरवठा करण्याची क्षमता या गावात आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजूबाजूचा परिसर विविध पिके आणि फळबागांनी बहरला असून, राज्यभरातील ग्रामपंचायती काम पाहण्यासाठी गावाला भेटी देत आहेत.
औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर गोलटगावपासून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या काºहोळ गावातील ग्रामस्थांना जवळपास २०१३ पूर्वी हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत होती. कधी कधी टँकरनेही पाणीपुरवठा करण्यात येत होता.
या त्रासाला कंटाळून अनेकांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला
होता. यानंतर २०१५ मध्ये ग्रामपंचायत, गावकरी, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने (सीएसआर) गावचा कायापालट केला. सीएसआरने हे गाव सेवा संस्थेला दिले. त्यांच्या सहकार्याने गावात जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. पाहता पाहता जवळपास तीन वर्षांत गावाच्या आजूबाजूला ९ सिमेंट बंधारे व चार मातीनाला बांध तयार करण्यात आले. काम पूर्णत्वास येताच पावसाळ्यात या बंधाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विहीर तसेच बोअर, हँडपंपांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आजघडीला बोअर आणि विहिरींची पाणीपातळी ८ ते १० फुटांवर आली आहे. येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजघडीला ४४.२९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटला आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी पाणी नसल्यामुळे येथील शेतकरी हंगामी पिके घेत असत. फळबागा लागवडीचा कुणी विचारही करीत नव्हता. मात्र, आता गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गव्हासह डाळिंब, द्राक्ष, मोसंबीची पिके घेत आहेत. यामुळे बळीराजाच्या आर्थिक वृद्धीस मदत झाली आहे. पावसाचे पाणी शिवाबाहेर न जाऊ देण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला आहे. येत्या एक वर्षात गावात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब शिवारात जिरवू, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच सचिन खलसे यांनी दिली.
गावाचा झालेला कायापालट पाहून जिल्ह्यासह राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावाला आवर्जून भेट देत आहेत. अशी कामे आमच्या गावात करण्याची मागणी होत असल्याची माहिती प्रकल्प अभियंता अरविंद येलम यांनी दिली. या कामांसाठी सेवा संस्थेचे सचिव चंद्रशेखर चारठाणकर, उपसरपंच रुख्मिणी खलसे, ग्रामपंचायत सदस्य, संदीप पाचफुले यांच्यासह गावकºयांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती सरपंच हिरामण ढगे यांनी दिली.

Web Title:  The former drought-stricken is now 'watery'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.