माजी न्यायमूर्ती बी.एन.देशमुख यांचे औरंगाबादमध्ये निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 09:50 AM2020-05-29T09:50:13+5:302020-05-29T10:31:35+5:30

शेतकरी, कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते

Former Justice BN Deshmukh dies in Aurangabad | माजी न्यायमूर्ती बी.एन.देशमुख यांचे औरंगाबादमध्ये निधन

माजी न्यायमूर्ती बी.एन.देशमुख यांचे औरंगाबादमध्ये निधन

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती,माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख ( बी.एन.) देशमुख काटीकर (८५वर्षे) यांचे मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

न्यायमूर्ती बी एन देशमुख यांचे मूळगाव तुळजापूर तालुक्यातील काठी होते .त्यांचे वडील उस्मानाबाद येथे वकिली व्यवसाय करीत असत. त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथे घेऊन मुबई उच्च न्यायालयात रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीस सुरवात केली. 

औरंगाबाद खंडपीठ उभारण्यात मोलाची भूमिका
औरंगाबाद येथे  मुंबई उच्च न्यायालयाचे  खंडपीठ व्हावे अशी  त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी तेथील वकील संघात केलेल्या भाषणात औरंगाबादला खंडपीठाची का आवश्यकता आहे हे पटवून दिले. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरु झाल्याबरोबर त्यांनी औरंगाबाद येथे वकीलीला प्रारंभ केला. त्यानंतर १९८६ मध्ये त्यांची न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली. शेतकरी, कष्टकरी कामगार  तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते. १९९७ साली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते निवृत्त झाले .

निवृत्तीनंतर औरंगाबाद येथे स्थायी झाले
निवृत्तीनंतर त्यांनी शासनाचे कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात  आपल्या वकीलीस प्रारंभ केला.त्यांच्या वयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय बंद केला आणि दिल्लीवरून ते औरंगाबादला स्थायी झाले.

विधानपरिषदेचे आमदार म्हणून कारकीर्द गाजली

विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. ते विधान परिषदेचे ६ वर्ष सदस्यही होते. त्यांनी विधान परिषदेचे सदस्य असताना शासनाला अनेक प्रश्नांवर धारेवर धरले होते. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे भाच्चे होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. 

Web Title: Former Justice BN Deshmukh dies in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.