राष्ट्रवादीचे माजी आमदार ठाकरे गटात; भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांच्या हाती शिवबंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:56 PM2022-12-14T17:56:16+5:302022-12-14T17:56:50+5:30
आ. सतीश चव्हाण यांच्यासोबतच्या वादातून भाऊसाहेब चिकटगावकरांनी घेतला निर्णय
औरंगाबाद: राष्ट्रवादीत नाराज असलेले वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीची घडयाळ काढत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधत त्यांचा समर्थकांसह पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत चिकटगावकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत वैजापूर येथील काँग्रेसच्या ठोंबरे गटाला आ. सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता. चिकटगावकर यांचा विरोध असतानाही पक्षप्रवेश झाल्याने नाराज असलेल्या चिकटगावकर यांनी वैजापूर तालुक्यात समर्थकांशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. चिकटगावकर यांच्या प्रवेशाने आता खिंडार पडलेल्या ठाकरे गटाची मतदारसंघात ताकद वाढणार आहे.
भाऊसाहेब चिकटगावकर आणि सतीश चव्हाण यांच्यात वाद
भाऊसाहेब चिकटगावकर यांनी काही दिवसांपूर्वी वैजापूर येथे पत्रकार परिषद घेत आ. सतीश चव्हाण यांच्यावरील नाराजीला वाट करून दिली होती. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार आहेत त्याठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी पक्षात वेगळा गट तयार करण्याचे काम आमदार चव्हाण करतात. त्यानंतर निवडणूक लागताच त्या गटाला विरोधी पक्षात पाठवून आपल्याच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याचे काम चव्हाण यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप चिकटगावकर यांनी केला होता.