‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर आदर्श पाटोदाचे माजी सरपंच भास्कर पेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:04 AM2021-07-30T04:04:41+5:302021-07-30T04:04:41+5:30
: सोनी मराठी वाहिनीवरून शनिवारी होणार शोचे प्रसारण : सोनी मराठी वाहिनीवरून शनिवारी होणार शोचे प्रसारण वाळूज महानगर : ...
: सोनी मराठी वाहिनीवरून शनिवारी होणार शोचे प्रसारण
: सोनी मराठी वाहिनीवरून शनिवारी होणार शोचे प्रसारण
वाळूज महानगर : सोनी मराठी वाहिनीवरील रिॲलिटी शो ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पा. पेरे हे प्रेक्षकांना दिसणार आहेत. शनिवारी (दि.३१) रात्री ९ वाजता ‘कर्मवीर विशेष’ या भागात या शोचे प्रसारण होणार आहे. या शोचे प्रोमो सध्या दाखविले जात आहेत.
औरंगाबाद शहरापासून हाकेच्या अंतरावरील पाटोद्याचे तत्कालीन सरपंच भास्कर पा. पेरे यांनी लोकसहभागातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यात ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांना मोफत दळण, सौर ऊर्जेचा वापर, गावात गुटखा व दारू विक्रीस बंदी, अंघोळीसाठी दररोज गरम पाणी, शालेय विद्यार्थ्यांना दूध वाटप, निराधारांसाठी अन्नछत्र योजना, सांडपाण्याचे व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ख्याती देशविदेशात पसरली आहे. या कार्याची दखल घेत राष्ट्रपती पुरस्कारासह विविध शेकडो पुरस्कार या ग्रामपंचायतीला मिळालेले आहेत. अल्पावधीत गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अहोरात्र झटणारे भास्कर पेरे यांच्या कार्याची दखल घेऊन ‘कोण होणार करोडपती’ या रिॲलिटी शोसाठी त्यांना निमंत्रित केले होते. हे निमंत्रण स्वीकारल्यानंतर सोनीची टीम दि.१६ व १७ जुलै रोजी पाटोद्यात आली. नागरिकांशी संवाद साधून विकासकामाचे चित्रीकरण केले. पेरे यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करून त्यांचे मनोगत जाणून घेतले.
गावात दोन दिवस शूटिंग आटोपल्यानंतर दि.१९ जुलै रोजी भास्कर पेरे ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर विराजमान झाले. या शोचे होस्ट प्रसिद्ध सिनेअभिनेते सचिन खेडकर यांनी आपल्या खास अंदाजात पेरे यांच्याशी गप्पा मारत विविध प्रश्न विचारले होते. पेरे यांनी ग्रामीण बोलीभाषेत खेडकर यांच्या प्रश्नांची उत्तरे देत प्रेक्षकांची दाद मिळविली. त्यांनी गावाच्या विकासासाठी केलेला संघर्ष व परिश्रमाचे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या शोमध्ये गावातील अनुराधा पेरे, दीपाली पेरे, जमिलाबी शेख, ह.भ.प. अभंग पठाडे महाराज, पी.एस. पाटील, दिलीप पेरे, गणेश पेरे आदींनी माजी सरपंचांनी गावात राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
फोटो -भास्कर पेरे
-------------------------