माजी कुलगुरू, जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 03:52 PM2022-11-30T15:52:08+5:302022-11-30T15:52:35+5:30

२००५ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले.

Former Vice-Chancellor, Senior Literary Nagnath Kotapalle passed away | माजी कुलगुरू, जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

माजी कुलगुरू, जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

googlenewsNext

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे आज दुपारी निधन झाले. पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. 

मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. साहित्यसेवा सुरु असतानाच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी आली. ही जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. १९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते.  मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदा
‘मूड्स’ (कवितासंग्रह)
‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ (कथासंग्रह)
‘राजधानी’ (दीर्घकथा संग्रह)
‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ (कादंबरी)
‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता : एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ (समीक्षात्मक)
‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी)
‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ (ललित गद्य),
‘जोतीपर्व’ (अनुवादित पुस्तक)
‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ (संपादन)
पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

Web Title: Former Vice-Chancellor, Senior Literary Nagnath Kotapalle passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.