गड राखला पण...
By Admin | Published: October 22, 2014 12:28 AM2014-10-22T00:28:35+5:302014-10-22T01:20:25+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील गड राखण्यात शिवसेना यशस्वी झाली. सेनेचे संजय शिरसाट येथून दुसऱ्यांदा विजयी झाले.
औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील गड राखण्यात शिवसेना यशस्वी झाली. सेनेचे संजय शिरसाट येथून दुसऱ्यांदा विजयी झाले. शिरसाट यांनी पहिल्यापासून आघाडी कायम ठेवली; पण तरीही त्यांना भाजपाच्या मधुकर सावंत यांच्याकडून कडवे आव्हान मिळाले. लोकांनी सावंत यांच्याही पारड्यात भरभरून मते टाकली. बहुतेक ठिकाणी दोघांनाही जवळपास सारखी मते मिळाली; पण त्यातही दौलताबाद, अब्दीमंडी, वडगाव कोल्हाटी, शरणापूर, पंढरपूर, तसेच शहरातील पदमपुरा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, उस्मानपुरा, एकनाथनगरसारख्या भागाने शिरसाट यांच्यावर एकतर्फी विश्वास दाखविला. त्यामुळेच शिरसाट यांचा विजय निश्चित होऊ शकला.
औरंगाबाद पश्चिम हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या भागात शिवसेनेचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या विजयाची सर्वांनाच खात्री होती; पण प्रत्यक्षात भाजपाच्या सावंत यांनी तेवढीच कडवी झुंज दिली. शहर आणि ग्रामीण भागातून संजय शिरसाट आणि सावंत यांना जवळपास बरोबरीची मते मिळाली. मात्र, पदमपुरा येथील सहा मतदान केंद्रांवर शिरसाट यांना एकतर्फी साथ मिळाली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील दौलताबाद, अब्दीमंडी येथे शिरसाट यांचा वरचष्मा दिसून आला. अपवाद वगळता या ठिकाणी एमआयएम पुरस्कृत पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार गंगाधर गाडे आणि शिरसाट या दोघांनाच मते मिळाली. करोडी, साजापूर आणि पंढरपूर येथील मतदारांनीही शिरसाट आणि गाडे या दोघांच्या पदरात मतांचे दान टाकले. त्यामुळे येथे सावंत यांना अतिशय कमी मते मिळाली. सातारा- देवळाई भागात सुमारे वीस हजार मतदार आहेत. या भागातून सावंत आणि शिरसाट यांना सारखीच साथ मिळाली.
सावंत हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना एकूण ५४ हजार ३५५ मते मिळाली. विशेषत: त्यांना शहानूरवाडी येथील १३ मतदान केंद्रांवर तसेच पीरबाजार, एकनाथनगर येथील दहा मतदान केंद्रांवर एकतर्फी मतदान झाले. न्यू उस्मानपुरा भागातही सावंत यांच्या पारड्यात लोकांनी भरभरून मतदान केले, तर गंगाधर गाडे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी एकूण ३५ हजार मते घेतली.
गाडे यांना दलित आणि मुस्लिमबहुल भागांत चांगल्या प्रकारे पहिल्या क्रमांकाची मते मिळाली. त्यापाठोपाठ शिरसाट यांनाही काही मते मिळाली; पण भाजपा उमेदवार सावंत यांना मात्र तुरळक मते मिळाली. गाडे यांना छावणीतील पेन्शनपुरा, दर्जीबाजार, कर्णपुरा, नेहरू चौक, तसेच मिटमिटा येथेही चांगली मते मिळाली. काँग्रेसचा परंपरागत मतदार एमआयएमकडे सरकल्याने काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र देहाडे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. देहाडे यांना सर्वच भागात तुरळक मते मिळाली. देहाडे यांना एकूण १४ हजार ७९८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद दाभाडे यांनाही अवघ्या ५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष या ठिकाणी निष्प्रभ ठरले. त्यामुळे आगामी काळातही या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा असाच लढा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर-ग्रामीणमध्ये चांगली साथ
कांचनवाडी, नक्षत्रवाडी, तसेच शहरातील स्नेहनगर, एकनाथनगर, कोकणवाडी येथेही शिरसाट यांना चांगली मते मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला. शिरसाट हे अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांना शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही चांगली साथ मिळाली.