गोदाम फोडून चाळीस क्वींटल तूर चोरीचा झाला उलगडा; तिघाजांना दोन दिवस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:01 PM2021-02-10T14:01:19+5:302021-02-10T14:03:25+5:30
Crime News या टोळीतील कबीर बुढाण आणि गोपाल उर्फ टोपी बोरुडे हे दोन चोरटे फरार आहेत.
औरंगाबाद : औरंगाबाद- बीड मार्गावर चितेगाव शिवारात असलेले गोदाम फोडून २ लाख रुपये किमतीची तब्बल ४० क्वींटल तुर चोरून नेणार्या टोळीतील तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली. त्यांना मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
इलियास सुलेमान खान (३२, रा. जिन्सी), जब्बार बुढण पठाण (२८, रा. श्रीपत धामनगाव ता. परतुर जि. जालना) आणि रवि लक्ष्मण वाहुळे (२७, रा. पिंपळी धामणगाव ता. परतुर जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीतील कबीर बुढाण आणि गोपाल उर्फ टोपी बोरुडे हे दोन चोरटे फरार आहेत. प्रकरणात मनिष उर्फ अनिल जगनलाल साहुजी (५४, रा. पवन नगर, टिव्ही सेंटर) यांनी फिर्याद दिली. साहुजी हे भुसार माल खरेदी करुन त्याची विक्री करतात. साहुजी यांनी चितेगाव शिवारातील निलेश गावंडे यांचे बीड-औरंगाबाद रोडवरी गोदाम किरायाने घेतले असून त्यात ते धान्य साठवून ठेवतात. १० जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास साहुजी यांनी गोदामात तुरीच्या ८० गोण्या ठेवल्या होत्या. ७ फेब्रुवारी रोजी साहुजी यांनी गोदाम उघडून पाहिले असता, तुरीच्या ६५ गोण्या चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरु असताना इलियास खान, जब्बार पठाण, कबीर पठाण आणि गोपाल उर्फ टोपी यांनीच गोदाम फोडून चोरी केली असल्याची स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी इलियास खान याला अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्याने सदरील चोरी ही जब्बार पठाणच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तचोरलेली तुर ही रवि वाहुळे व माजलगाव (जि. बीड) येथील बाजार समितीतील निखील ट्रेडींग येथे विक्री केल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी वरील तिघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तुरीच्या गोण्यांपैकी ३८ गोण्या जप्त केल्या आहेत. न्यायालयात सरकारी वकील निता किर्तीकर यांनी बाजू मांडली.