पावणेतीन कोटी मिळाले
By Admin | Published: July 15, 2017 12:15 AM2017-07-15T00:15:55+5:302017-07-15T00:17:23+5:30
परभणी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २०१७-१८ या वर्षासाठी २ कोटी ७० लाख ४ हजार रुपये जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २०१७-१८ या वर्षासाठी २ कोटी ७० लाख ४ हजार रुपये जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक विकासात्मक योजना राबविल्या जातात. यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन हे अभियान शेतकऱ्यांसाठी राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना २०१७-१८ या वर्षात सामूहिक शेततळे, सेडनेट हाऊस, हरितगृह, अंबा, पेरु घन लागवड, सुटी फुले, कंदवर्गीय फुले, दांड्यांची फुले इ. कृषीपूूरक योजना राबविता येणार आहेत. यासाठी शासनाने २ कोटी ७० लाख ४ हजार रुपये जिल्ह्याकरिता मंजूर केले आहेत.
या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीसाठी ८ टक्के, अनुसूचित जातीसाठी १६ टक्के तर सर्वसाधारण गटासाठी ७६ टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या हेतुने शासनाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज विभागाच्या वेबसाईटवर आॅनलाईन भरुन प्रिंट काढून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३१ जुलैपर्यंत सादर करावयाचे आहेत. त्यानंतर तालुकास्तरावरुन परिपूर्ण प्रस्तावातून जिल्हास्तरावर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.