कामगारांना लुटणाऱ्या कुख्यात ‘विकी हेल्मेट’सह चौघांना बेड्या
By राम शिनगारे | Published: February 8, 2023 09:03 PM2023-02-08T21:03:25+5:302023-02-08T21:04:38+5:30
मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई : चक्क ‘फोन पे’द्वारे घेतले होते ६ हजार
औरंगाबाद : फरशी बसविण्याचे काम संपवून मित्रांसोबत मुकुंदवाडीतून पिसादेवीकडे जात असलेल्या तीन कामगारांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील १५ हजार रुपये लुटणाऱ्या कुख्यात विकी हेल्मेटसह चौघांना मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या. या चौघांकडून २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल ससे यांनी दिली.
आरोपींमध्ये विकी ऊर्फ हेल्मेट, अनिकेत हिवाळे, चंदू साळवे व नीलेश साळवेचा समावेश आहे. फरशी कामगार साेयत पटेल, अभिषेक भातारी व बिपांशू चौधरी हे २३ जानेवारी रोजी मुकुंदवाडीतील काम संपवून पिसादेवी येथील घराकडे दुचाकीवर जात होते. तेव्हा त्यांना संजयनगरात अडवून त्यांच्याकडील रोख ८५०० रुपये आणि सोयम पटेल यांच्या ‘फोन पे’मधून ६ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेत मारहाण केली होती. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात लुटल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
त्यातील चारही आरोपींना मुकुंदवाडी ठाण्याच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक पंकज मोरे, हवालदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, संतोष भानुसे, मनोहर गिते, अनिल थोरे, गणेश वाघ व श्याम आढे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या आरोपींनी डिसेंबर २०२२ मध्ये एन-२ भागात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावल्याची कबुली दिली. या आरोपींकडून २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल ससे यांनी दिली.
दुचाकी चोरास अटक
मुकुंदवाडी ठाण्याचे विशेष पथक हद्दीत गस्त घालीत असताना जय भवानीनगर गल्ली नं. ११ मध्ये गाडी विक्रीसाठी एक जण येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून शुभम तांबे यास पकडण्यात आले. त्याने पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही दुचाकी (एमएच २४ एव्ही २०९७) जप्त केल्याचेही निरीक्षक ससे यांनी सांगितले.