करंजगाव दरोड्यातील चार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2016 12:07 AM2016-09-07T00:07:56+5:302016-09-07T00:37:51+5:30
औरंगाबाद : करंजगाव (ता. वैजापूर) दरोडा प्रकरणातील चार आरोपींच्या ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने मुसक्या आवळल्या.
औरंगाबाद : करंजगाव (ता. वैजापूर) दरोडा प्रकरणातील चार आरोपींच्या ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने मुसक्या आवळल्या.
गिनेश ऊर्फ घाऱ्या किरस ऊर्फ टबूक चव्हाण (३३, रा. महालगाव, ह.मु. कोपरगाव), शिवा ऊर्फ कुणाल सलाजित चव्हाण (२१, रा. कोपरगाव), देवा ऊर्फ काळ््या जैनू काळे (२६, रा. बिलोणी, ह.मु. कोपरगाव) आणि राम ऊर्फ काळ््या गोपाळ पिंपळे (२२, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून दरोड्यातील दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दरोडेखोरांनी ३० आॅगस्ट रोजी रात्री एकच्या सुमारास रोठे वस्ती आणि नरोडे वस्ती येथे दरोडे टाकले होते. रोठे वस्ती येथे आरोपींनी कुऱ्हाडीने दार तोडून घरात प्रवेश केला. घरात असणाऱ्या दोन महिलांनी संरक्षणासाठी गच्चीवर धाव घेतली. गच्चीवरून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना दरोडेखोरांनी त्यांना गाठले. महिला व तिच्या आईला त्यांनी जबर मारहाण केली. त्यांच्या अंगावरील ४५ हजार रुपयांचे दागिने घेऊन नंतर नरोडे वस्ती गाठली. त्या ठिकाणीही काही जणांना जबर मारहाण केली. याप्रकरणी वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
थरारक पाठलाग
दरोड्यातील आरोपी हे कोपरगावचे रहिवासी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांना खबऱ्याकडून समजली. त्यानुसार सहायक निरीक्षक ब्रम्हगिरी, फौजदार पी. डी. भारती, दीपक सरोदे, मगरे आदींच्या पथकाने कोपरगाव गाठले. आरोपी कोपरगाव रेल्वेस्थानकाजवळ असल्याची माहिती पथकास मिळाली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्यांना पकडले.