बोंडअळीपासून संरक्षित चार एकरवरील कापूस अज्ञाताने उपटून फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:48 AM2018-08-08T11:48:01+5:302018-08-08T11:49:08+5:30
बोंडअळीपासून संरक्षित चार एकरवरील कापूस अज्ञाताने उपटून फेकल्याची खळबळजनक घटना सोयगाव तालुक्यात आज सकाळी उघडकीस आली.
औरंगाबाद : बोंडअळीपासून संरक्षित चार एकरवरील कापूस अज्ञाताने उपटून फेकल्याची खळबळजनक घटना सोयगाव तालुक्यात आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सोयगाव तालुक्यातील कंकराळा गावालगत दिलीप तापेराम पाटील यांची गट क्रमांक-४९ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी चार एकरावर कापसाची लागवड केली आहे. मागील वर्षीचा कापसावरील बोंडअळीचा अनुभव पाहता त्यांनी यावर्षी या पिकावर विविध उपाय योजना केल्या. कृषी विभागाच्या आणि कीडरोग सर्वेक्षण सल्ला केंद्रच्या निदान पद्धतीवरून पाटील यांनी पिकाला बोंडअळीपासून मुक्त ठेवले. तालुक्यात सध्या बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असताना या पिकाला त्यांनी मेहनतपूर्वक संरक्षित केले.
मात्र, आज सकाळी पाटील शेतात आले असता त्यांना चार एकरवरील संपूर्ण पिक अज्ञाताने उपटून टाकल्याचे निदर्शंनास आले. यामुळे त्यांची पिकावरील संपूर्ण मेहनत वाया गेली असून मोठा आर्थिक फटका बसला आहे. याप्रकरणी पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच घटनेचा पंचनामा करण्यासाठीचे निवेदन सोयगाव तहसील कार्यालयात दिले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.