४० लाख कर्ज असताना बनावट एनओसीद्वारे विकली जमीन, आता बँकेने लिलावात दुसऱ्याला दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 05:35 PM2024-01-27T17:35:53+5:302024-01-27T17:36:52+5:30
बँकेने लिलावाद्वारे पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला दिली जमीन
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील आरापूर गावातील ४ एकर २ गुंठे जमिनीवर मालकाने एसबीआय बँकेकडून ४० लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज असतानाच बँकेचे बनावट बेबाकी प्रमाणपत्र तयार करून महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमताने तीन जणांना ४८ लाख रुपयांना जमिनीची विक्री केली. बँकेने कर्ज वसूल होत नसल्यामुळे जमिनीचा लिलाव करून ती जमीन दोन जणांना ४० लाख ६० हजार रुपयांना विक्री केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसातील शिल्लेगाव ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने नुकताच सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
आरोपींमध्ये जमिनीचे मालक अल्पना महावीर सुराणा, महावीर माणिकचंद सुराणा, भारत सुखाजी जाधव, अरुण विश्वनाथ गणपुरे, बाबासाहेब गंगाधर साळुंके, मारोती विठ्ठल गवळी यांचा समावेश आहे. सचिन आदमाने (रा. सातारा परिसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यासह शेख शब्बीर शेख बाबूलाल व मोहम्मद सोहराब मोहम्मद महफुज आलम (दोघे रा. वाळूज) या तिघांनी अल्पना सुराणा यांच्या नावावर असलेली आरापूर गावातील गट नंबर २९ मधील ४ एकर २ गुंठे जमीन इतर आरोपींच्या मध्यस्थीने ४ मे २०१२ रोजी ४८ लाख रुपयांना खरेदी केली होती. तेव्हापासून त्या जमिनीवर त्यांचाच ताबा आहे.
या जमिनीवर आरोपी भारत जाधव याच्या वतीने सुमेध फार्म हाउस नावाने एसबीआयकडून ४० लाख ६० हजार रुपये कर्ज घेतले होते. फिर्यादींना ही जमीन विकताना एसबीआय बँकेची बनावट बेबाकी प्रमाणपत्र आणून महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यावरील कर्जाचा बोजा कमी करून विक्री केली. कर्जफेड न झाल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने ही जमीन कटारिया व वेलंगी यांना विकण्यात आली. त्यांनी सदरील जमिनीवर पाटी लावल्यानंतर फिर्यादीस हा प्रकार समजला. त्यानंतर कार्यालयातून कागदपत्रे हस्तगत केल्यानंतर सहा आरोपींनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी शिल्लेगाव ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
या प्रकरणात फिर्यादींनी सुरुवातीला शिल्लेगाव ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी तक्रार दिली. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही पोलिसांनी न केल्यामुळे फिर्यादी न्यायालयात गेले. न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.