अज्ञात रोगामुळे चार जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:05 AM2021-03-23T04:05:02+5:302021-03-23T04:05:02+5:30
बाजारसावंगी : परिसरातील सावखेडा व बोडखा गावातील जनावरांना अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या तीन दिवसात एक बैल ...
बाजारसावंगी : परिसरातील सावखेडा व बोडखा गावातील जनावरांना अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या तीन दिवसात एक बैल व तीन गाईंचा मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली असून पशुपालक चिंतेत पडले आहेत. तसेच दक्षता घेत पशुवैद्यकीय विभागाकडून सोमवारी दोन्ही गावांतील ३५ जनावरांची तपासणी करण्यात आली.
सावखेडा गावात मागील आठवडाभरापासून जनावरांना विचित्र आजार होऊ लागला आहे. जनावरे आजारी पडत असल्याचे काही पशुपालकांच्या लक्षात आले. त्यांनी बोडखा येथील पशु दवाखान्यात तसेच खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून जनावरांची तपासणी करून औषधोपचार दिले. पण त्यात गेल्या तीन दिवसात अजिनाथ कणके यांच्या मालकीचा एक बैल व एक गाय आणि अशोक नाके यांच्या दोन गाईंचा मृत्यू झाला. या घटनेने गावातील पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोडखा गावाचे सरपंच अशोक जाधव व गावातील अन्य लोकांनी पशु विभागाच्या वरिष्ठांना ही माहिती देऊन, जनावरांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली. सोमवारी बोडखा व सावखेडा गावात डॉ. शिल्पा चौधरी, डॉ. भालेराव, डॉ. इटावले यांनी गावातील ३५ जनावरांची तपासणी केली. याप्रसंगी अराफत शहा, संपत गायकवाड, ज्ञानेश्वर कणके, अनिल कणके, अजिनाथ कणके, अशोक नाके यांची उपस्थिती होती.
फोटो :
सावखेडा-बोडखा गावातील जनावरांची तपासणी करताना पशु विभागाचे डॉक्टर व उपस्थित गावकरी.