सामूहिक बलात्कारप्रकरणी चौघांना अटक
By Admin | Published: June 25, 2014 01:21 AM2014-06-25T01:21:47+5:302014-06-25T01:28:51+5:30
अजिंठा : आमसरीच्या डोंगरात फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाचे मोबाईलद्वारे अश्लील चित्रीकरण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आमसरी येथील चार तरुणांना मंगळवारी अजिंठा पोलिसांनी अटक केली.
अजिंठा : सिल्लोड तालुक्यातील आमसरीच्या डोंगरात फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाचे मोबाईलद्वारे अश्लील चित्रीकरण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आमसरी येथील चार तरुणांना मंगळवारी अजिंठा पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील वडगाव एक प्रेमीयुगुल आमसरी येथील महादेव अंबऋषी देवस्थानावर दर्शनासाठी आले होते. देवदर्शनानंतर जवळच्या डोंगरात हे प्रेमीयुगुल फिरण्यासाठी गेले. या दरम्यान आमसरी येथील विजय रमेश तराळ (२०), रामधन पुंडलिक तराळ (२३), गजानन भगवान तराळ (२२) व समाधान गोविंदा काळे (२२) हे चार तरुण त्यांच्या मागावर होते. या चौघांनी डोंगरात फिरताना प्रेमीयुगुलाचे मोबाईलद्वारे गुपचूप अश्लील चित्रीकरण केले. यानंतर प्रेमीयुगुलास गाठून धमकी दिली. आम्ही वन विभागाचे कर्मचारी आहोत, तुम्ही जंगलात काय करीत आहात, तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करावे लागेल, तुमचे लफडे आहे, असे धमकावून दोघांंना मारहाण केली. यातील दोन तरुणांनी तरुणीस ओढत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिसऱ्या तरुणाने बलात्काराचे शूटिंग केले, तर चौथ्याने प्रियकरास पकडून ठेवले. ही घटना दि. २५ मे रोजी घडली होती.
बदनामीच्या धाकाने प्रेमीयुगुल चूप
घडलेल्या भयंकर घटनेने हे प्रेमीयुगूल भयभीत झाले होते; परंतु तक्रार केली तर आपलीच बदनामी होईल म्हणून या हेतूने त्यांनी तक्रार न करता आपले घर गाठले. यानंतर या चार आरोपींनी सदरचे अश्लील चित्रीकरण व्हॉटस् अॅप व मेलद्वारे मित्रमंडळी व मुलीच्या नातेवाईकांना पाठविले.
महिनाभरात खूप चर्चा झाल्याने या घटनेला वाचा फुटली. शेवटी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी धीर देत सोमवारी अजिंठा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून या चार तरुणांना अटक केली.
शूटिंग करणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
सामूहिक बलात्काराचे शूटिंग करणाऱ्या तरुणाने पोलिसांच्या धाकाने गेल्या आठवड्यात विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता; पण तो यातून बचावला. तोही पोलिसांच्या ताब्यात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास अजिंठ्याचे सपोनि. शंकर शिंदे, फौजदार अनंत जगताप, आर.एन. छत्रे, अजित शेकडे, एस.डी. नवसारे करीत आहेत.